‘विज्ञानगंगा’त डॉ. प्रमोद काळे यांचे मत

स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सर्वच शासन यंत्रणा आपल्या कारभारातील पारदर्शकता वाढवण्यासाठी जीपीएस प्रणालीचा वापर करू शकते. त्यातून नागरिकांचा व्यवस्थेवरील विश्वास वाढण्यासाठी मदत होईल, असे मत इस्त्रोच्या स्पेस नेव्हीगेशन सेंटरचे शास्त्रज्ञ डॉ प्रमोद काळे यांनी व्यक्त केले. बदलापूरातील भौगोलिक स्थलदर्शन प्रणालीवरील व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, युवाराज प्रतिष्ठान आणि मराठी विज्ञान परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञानगंगा या मालिकेतील चौथ्या पुष्पात भौगोलिक स्थलदर्शक प्रणाली या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ प्रमोद काळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.   मोबाईलच्या माध्यमातून मिळणारे लोकेशन असो वा खाजगी वाहतूक कंपन्यांकडून वापरले जाणारे तंत्र, यातून जीपीएस प्रणालीचा वापर मोठय़ा प्रमाणावर होतो आहे. तसाच वापर पालिका आणि प्रशासनाने आपल्या कारभारावर लक्ष ठेवण्यात केल्यास त्याचा यंत्रणेवर वचक ठेवण्यास मदत होईल.  तामिळ भाषेतील ग्रंथात चौथ्या शतकात जीपीएस प्रणालीचा वेगळ्या रूपात उल्लेख झाला होता. त्यानंतर ज्ञानेश्वरीत याचा उल्लेख आढळतो. आपत्कालिन परिस्थितीतही जीपीएसने अनेकदा महत्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सध्या अनेक विद्यार्थ्यांची स्पेस विषयात रूची वाढत असून गेल्याच महिन्यात भारताने सोडलेल्या २० उपग्रहांपैकी एक उपग्रह हा पुण्याच्या विद्यार्थ्यांनी तयार केला होता. त्यामुळे उद्याचे युवकच या प्रणालीला विकसित करणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.  युवाराज प्रतिष्ठानचे आशिष दामले यावेळी उपस्थित होते.