ठाणे : घोडबंदर येथील वाघबीळ रेतीबंदर परिसरात अवैधरित्या रेती उपसा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकाने तीन लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या रेती उपशामुळे कांदळवनाचे देखील नुकसान झाले आहे.

वाघबीळ येथील रेतीबंदर कासारवडवली पोलिसांना रविवारी दुपारी रेतीने भरलेला टेम्पो आढळून आला. पोलिसांनी त्या टेम्पो चालकाला अडवून त्याची चौकशी केली असता, त्याने ही रेती वाघबीळ रेतीबंदरातून आणल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कासारवडवली पोलिसांनी याबाबतची माहिती महसूल विभागाच्या भरारी पथकाला दिली. महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने रेतीबंदर परिसरात पाहणी केली असता, त्यांना तेथे मोठ्याप्रमाणात अवैधरित्या रेती उत्खनन झाल्याचे समोर आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या रेती उपशामुळे कांदळवनाचे नुकसान झाले होते. पथकाने अवैधरित्या उपसा केलेल्या रेती साठ्याची मोजणी केली असता, तीन लाख १६ हजार रुपयांची रेती आढळून आली. त्यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या प्रकरणी टेम्पो चालक आणि अज्ञात व्यक्तीविरोधात मंडळ अधिकाऱ्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५, १९ आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम ४८ (७) यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.