कल्याण डोंबिवली शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक पोलिसांची सातत्याने गस्त सुरू असल्याने शहर परिसरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी झाली आहे. असे असले तरी कल्याणमधील शिवाजी चौकातून सितलादेवी मंदिर आणि हनुमान मंदिराच्या गल्लीतून झुंजारराव बाजारात जाणाऱ्या दुचाकी वाहनांची नियमबाह्य़ वाहतूक सुरूच असल्याने या भागात सतत वाहतूक कोंडी होत आहे.

या बोळाच्या तोंडावर एक वाहतूक सेवक कायमस्वरूपी उभा असतो. बोळाच्या एका तोंडाला लोखंडी अडथळा उभा केलेला असतो. तरीही वाहतूक सेवकाला डावलून अनेक दुचाकी स्वार या बोळातून ये-जा करीत असतात. चुकीच्या ठिकाणाहून प्रवेश करणाऱ्या दुचाकी स्वारांकडून वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली तर हळूहळू या गल्लीतून होणारी वाहतूक थांबेल, असे येथील व्यावसायिकांनी सांगितले. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक उतरलेले अनेक प्रवासी स्कायवॉकवरून साई मंदिराजवळून झुंजारराव बाजारातून पायी घरी जातात. त्यांना या वाहतुकीचा नाहक त्रास होतो. झुंजारराव बाजारातून बाहेर येणारे दुचाकी स्वार सितलादेवी मंदिराच्या बोळातून बाहेर पडतात आणि त्याच वेळी शिवाजी चौकातून झुंजारराव चौकात जाणारे दुचाकी स्वार सितलादेवी मंदिराच्या बोळात प्रवेश करतात. मंदिराच्या पाठीमागील बोळात हे दुचाकीस्वार समोरासमोर आले की, पादचाऱ्यांना ये-जा करण्यास जागा राहत नाही. या बोळात खाद्य पदार्थाचे एक मोठे दुकान आहे. त्यामुळे येथील पदपथ, रस्ते नेहमी ग्राहकांच्या गर्दीने गजबजलेले असतात. दुचाकी स्वार घुसत असल्याने या बोळात नेहमी वाहतूक कोंडी होते.

लोखंडी अडथळे कापले

या मंदिराच्या प्रवेशद्वारावर यापूर्वी लोखंडी अडथळे उभे करण्यात आले होते. परंतु, समाजकंटकांनी ते लोखंडी खांब मुळापासून कापून काढले. तेव्हापासून दुचाकी स्वार या गल्लीबोळातून ये-जा करू लागले आहेत. महापालिका आणि वाहतूक विभाग यांनी एकत्रितपणे या प्रवेशद्वाराचे तोंड लोखंडी खांब उभे करून बंद केले आणि फक्त पादचाऱ्यांना ये-जा करण्यापुरती जागा ठेवली तर झुंजारराव बाजार, साईबाबा मंदिराकडे होणारी कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे, असे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.