डोंबिवली : एका मोबाईल विक्रीच्या दुकानात चोरी करून ते चोरीचे मोबाईल विठ्ठलवाडी भागात विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या दोन जणांना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी अटक केली. यामधील एक आरोपी सुरक्षा अधिकारी असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. वीरेंद्र जयवंत नाटेकर (३९, रा. धरमसाई पॅलेस, पिंटू पार्क हाॅटेलजवळ, उल्हासनगर-३), प्रेम श्यामजी दुवा (२९, रा. उल्हासनगर) अशी आरोपींची नावे आहेत. यामधील नाटेकर हा सुरक्षा अधिकारी आहे. कल्याण गुन्हे शाखेच्या पथकातील हवालदार दत्ताराम भोसले यांना गुप्त माहिती मिळाली की, चोरीचे मोबाईल विकण्यासाठी दोन इसम विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक भागात येणार आहेत. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पोलीस निरीक्षक राहुल मस्के, साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, संतोष उगलमुगले, उपनिरीक्षक संजय माळी, हवालदार बालाजी शिंदे, दत्ताराम भोसले, गुरुनाथ जरग, दीपक महाजन, मिथुन राठोड, गौरव रोकडे, विलास कडू यांच्या पथकाने सोमवारी विठ्ठलवाडी भागात सापळा रचला.

हेही वाचा : ठाण्यात दिशादर्शक, नो पार्किंग फलकांची चोरी; वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठरल्या वेळेत आरोपी नाटेकर, दुवा हे विठ्ठलवाडी भागात आले. त्यांच्या हातात पिशव्या होत्या. पोलिसांनी त्यांना हटकून त्यांच्या जवळील पिशव्या तपासल्या त्यात मोबाईल आढळले. हे मोबाईल कोठुन आणले याची समाधानकारक उत्तरे ते देऊ शकले नाहीत. पोलिसांना आरोपींनी माहिती दिली की, त्यांचा अंबरनाथ येथे राहणारा एक सहकारी फिरोज खान याने काही दिवसापूर्वी डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ एक मोबाईलचे दुकान रात्रीच्या वेळेत फोडून त्यामधील मोबाईल चोरले आहेत. ते चोरीचे मोबाईल विक्रीसाठी आपण या भागात आलो आहोत. पोलिसांनी आरोपींकडून ६२ हजार रुपये किंमतीचे कमती मोबाईल जप्त केले. त्यामध्ये सहा स्मार्ट फोन, एक टॅब होता, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक पवार यांनी दिली.