कल्याण: सकाळच्या वेळेत प्रवाशांची लोकल पकडण्याची घाई असताना या वेळेतच गर्दुल्ले, मद्यपी आणि मोगऱ्याचे गजरे विक्रेते फलाटावर, लोकलच्या दारात आडवे येतात. अनेक वेळा गर्दुल्ले, मद्यपी लोकलच्या दारात पडलेले असतात. घाईत असलेला प्रवासी वेगाने लोकलमध्ये चढला तर तो लोकल दारातील मद्यपीला ठेचकळत आत जातो. अनेक दिवसांंपासून हे प्रकार टिटवाळा, बदलापूर, कर्जत, नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाशी, पनवेल लोकलमध्ये सुरू आहेत.

रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी या मद्यपी, गर्दुल्ले, गजरे विक्रेत्यांना फलाटाच्या बाहेर अडविणे आवश्यक असते. पण रेल्वे सुरक्षा जवानांची नजर चुकून हे फिरस्ते लोकलमध्ये रात्रीच्या वेळेत चढतात. रात्रभर लोकलमध्ये झोपतात. सकाळच्या वेळेत लोकल प्रवासी सेवेत रुजू झाले तरी या फिरस्त्यांना त्याची खंत नसते. लोकलच्या दारात अनेक वेळा हे फिरस्ते आडवे पडलेले असतात. अनेक प्रवासी दररोज या मद्यपींना ठेचकळून पडतात. काही मद्यपी महिला प्रवाशांचा डब्यात पडलेले असतात. त्यामुळे महिलांना डब्यात अशा परिस्थितीत बसायचे कसे असे प्रश्न अनेक वेळा निर्माण होतात.

हेही वाचा : ठाणे: लष्कराच्या वाहनाच्या धडकेमुळे सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

कामावर वेळेत पोहचतो कधी अशी प्रत्येक प्रवाशांची हुरहुर असते. अशा वेळेत मोगऱ्याची फुले, जाईझुईची फुले यांचे गजरे करून ते विक्रीसाठी घेऊन महिला, मुले नियमित, वातानुकूलित लोकल डब्यात सकाळच्या वेळेत गर्दीत घुसतात. या मुला, महिलांच्या हातामधील टोपल्या आणि त्यांच्या फेऱ्यांचा प्रवाशांना नाहक त्रास होतो. बहुतांशी महिला वर्ग कार्यालयीन वेळ गाठण्याच्या चिंतेत असतो. त्यामुळे विक्रेत्यांच्या गजऱ्यांकडे कोणी ढुंकून पाहत नाही. वातानुकूलित डब्यात मात्र या गजरे विक्रेत्यांमुळे मोगरा फुलांचा दरवळ पसरतो, असे प्रवाशांंनी सांगितले.

आता शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे घरी बसण्यापेक्षा अनेक शाळकरी मुले गजरा आणि किरकोळ वस्तू विक्रीसाठी लोकलमध्ये शिरतात. फलाटावर येताना ही मुले आपल्या जवळील वस्तू एका पिशवीत भरतात. लोकलच्या डब्यात चढले की पिशवीतील सामान विक्रीसाठी बाहेर काढतात. त्यामुळे फलाटावरील गस्तीवरील सुरक्षा जवांनांना फेरीवाले मुले डब्यात चढतात हे निदर्शनास येत नाही, असे प्रवाशांनी सांंगितले.

हेही वाचा : सिग्नल यंत्रणेत बिघाड; साडेचार तास रेल्वेसेवा ठप्प; आसनगाव-आटगाव स्थानकादरम्यानची घटना

रात्रीच्या वेळेत लोकल कळवा, कुर्ला कारशेडला असतात. त्यावेळी तेथे मद्यपी, गर्दुद्ले असतात. ते रात्रीच्या वेळेत लोकलमध्ये चढून तेथेच पडून राहतात. या लोकल प्रवासी वाहतुकीसाठी सकाळी बाहेर पडल्या की गर्दुल्ले आहे त्या परिस्थितीत पडुनच प्रवास करतात. रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी अशा फिरस्त्यांना फलाटावर रोखण्याची प्रवाशांची मागणी आहे.