कल्याण: इलेक्ट्रो होमिओपॅथी या पदवीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन शिक्षण आणि औषध विभागाच्या शासन परिपत्रकानुसार वैद्यकीय व्यवसाय करण्यास परवानगी नाही. हे माहिती असुनही कल्याण पूर्वेतील माणेरे गावात साई क्लिनिकच्या माध्यमातून डाॅ. देवेंद्र पुजारी, डाॅ. श्रीकृष्ण कुमावत यांनी इलेक्ट्रो होमिओपॅथी या पदवीच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा चालू ठेवल्याच्या तक्रारीची दखल घेऊन कल्याण डोंबिवली पालिकेच्या वैद्यकीय विभागाने या दोन्ही डाॅक्टरांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची चौकशी करून त्यांच्या विरूध्द विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
पोलिसांनी पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. समीर सरवणकर यांच्या तक्रारीवरून या दोन्ही डाॅक्टरांविरुध्द भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८, ३१९, सह वैद्यकीय अधिनियम १९६१ च्या कलमाने गुन्हा दाखल केला आहे. एका जागरूक डाॅक्टरने डाॅ. कुमावत, डाॅ. पुजारी यांच्या विरुध्द दोन वर्षापूर्वी कल्याण डोंबिवली पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या.
डाॅ. सरवणकर यांनी प्राथमिक तपासणी अहवालात दिलेली माहिती अशी, की प्राप्त तक्रारीप्रमाणे गेल्या फेब्रुवारीमध्ये मी आणि सहकर्मचारी योगेश शेडगे, तक्रारदार मिळून उल्हासनगर चार हद्दीतील माणेरे गावातील साई क्लिनिक येथे संध्याकाळच्या वेळेत गेलो. तेथे एक रुग्णाला सलाईन लावण्यात आले होते. हे सलाईन डाॅ. श्रीकृष्ण कुमावत यांनी लावल्याचे त्याने तपासणी पथकाला सांगितले. या रुग्ण सेवेबाबत डाॅ. कुमावत यांना तपासणी पथकाने विचारणा केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे डाॅ. कुमावत यांनी दिली. त्यावेळी तेथे दालनात डाॅ. देवेंद्र पुजारी आले. त्यांनी आपली वैद्यकीय पदवी बी. ई. एम. एस. असल्याचे सांगितले. या पदवीची खातरजमा करण्यासाठी त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र पालिकेने ईलेक्ट्रो होमिओपॅथी महाराष्ट्र कौन्सिलकडे तपासणीसाठी पाठविले. त्यांनी डाॅ. पुजारी हे आमचे सदस्य असल्याचे आणि इलेक्ट्रो होमिओपॅथीत रुग्ण सेवा करण्यास पात्र असल्याचा अहवाल दिला.
महाराष्ट्र शासन शिक्षण आणि औषध विभागाच्या ऑगस्ट २००० च्या शासन परिपत्रकाप्रमाणे इलेक्ट्रोपॅथी आणि इलेक्ट्रो होमिओपॅथी या मान्यताप्राप्त पॅथी नाहीत. अशाप्रकारची पदवी असलेले अहर्ताधारक कोणत्याही वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करू शकत नाहीत. त्यामुळे ते अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक ठरतात.
वैद्यकीय व्यवसायाची परवानगी नसताना डाॅ. पुजारी, डाॅ. कुमावत यांनी साई क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णसेवा करून रुग्णांची फसवणूक केली आहे. त्यामुळे पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. सरवणकर यांनी या दोन्ही डाॅक्टरांविरुध्द विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. गेल्या वर्षभरात उल्हासनगर परिसरातील सुमारे दहाहून अधिक बोगस डाॅक्टरांवर गुन्हे दाखल आहेत. अशाप्रकारचे सुमारे २५ हून अधिक डाॅक्टर उल्हासनगर परिसरात सक्रिय असल्याची माहिती आहे. एक जागरूक डाॅक्टर रुग्णांच्या आरोग्याचा विचार करून या बोगस डाॅक्टरांच्या विरुध्द सुप्तपणे कारवाया करून त्यांच्या विरुध्द उल्हासनगर, कल्याण डोंबिवली पालिकेला कारवाया करण्यास भाग पाडत आहे.