बदलापूर: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत गुरुवारी मोठी वाढ झाली. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास बदलापुरातून उल्हास नदी इशारा पातळीवरून वाहत होती. बदलापुरात १६.५० मीटर ही इशारा पातळी आहे. तर १७.५० मीटर ही धोका पातळी आहे.
गुरुवारी सकाळी उल्हास नदी १६.५० मीटरवरून वाहत होती. तर जांभूळ आणि मोहने या दोन केंद्रांवरही उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली होती. त्यामुळे नदीकाठच्या शाळांना बंद ठेवण्याचा संदेश प्रशासनाकडून देण्यात आला होता. तर तशी घोषणाही नदी किनारी केली जात होती.
हे ही वाचा… VIDEO : ठाण्यातील महिलेने केलं पाकिस्तानात जाऊन लग्न; भारतात परतल्यावर म्हणाली, “फेसबुकवर…”
गेल्या तीन ते चार दिवसांपासून ठाणे, रायगड जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रायगड आणि ठाणे जिल्ह्यात वाहणारी उल्हास नदी दुथडी भरून वाहते आहे. माथेरान, कर्जत आणि भीमाशंकर या भागासह बदलापूर आणि परिसरात गेल्या दोन दिवसात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे सर्वच नाले भरून वाहत असून नदीच्या पाणी पातळीतही वाढ होते आहे. गुरुवारी उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ पाहायला मिळाली. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उल्हास नदी १६.५० मीटर अर्थात इशारा पातळीवरून वाहत होती. त्यामुळे खबरदारीचा इशारा म्हणून नदीकाठच्या शाळांना सुट्टी देण्याचे आवाहन करण्यात आले. तर स्थानिक प्रशासनाच्या वतीने नदीकिनारी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याबाबत घोषणा केली जात होती.
हे ही वाचा… बदलापूर पालिकेचा लाडका खड्डा पाहिला का? राष्ट्रवादीची पालिकेच्या विरूद्ध बॅनरबाजी
बदलापूर सोबतच उल्हास नदीच्या जांभूळ बंधारा आणि मोहने येथील केंद्रावरही नदी इशारा पातळीवरून वाहत होती. जांभूळ येथे इशारा पातळी १३ मीटर तर धोका पातळी १४ मीटर इतकी आहे. गुरुवारी सकाळी जांभूळ बंधारा येथून नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत होती. तर मोहन येथे इशारा पातळी नऊ मीटर असून धोका पातळी १० मीटर आहे. गुरुवारी सकाळी येथून उल्हास नदी नऊ मीटरवरून वाहत होती.