ठाणे : शहरात एकही क्लस्टर योजना यशस्वी होताना दिसत नसून शहरात केवळ क्लस्टरच्या नावाने दादागिरी सुरू आहे. काही लोकप्रतिनिधी क्लस्टर योजनेचे आमिष दाखवून नागरिकांना फसवत असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेते केला. ठाणे महापालिकेने तयार केलेल्या विकास आराखड्यात नियोजित रस्त्यासाठी कळव्यातील ४० अधिकृत इमारतींवर बुलडोजर फिरण्याची शक्यता आहे. यासंदर्भात, राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यादरम्यान, त्यांनी मराठी माणसाला उध्वस्त करणारा नियोजित विकास आराखडा रद्द करावा अशी मागणी केली असून सर्व रहिवाशांसह याविरोधात संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, क्लस्टर योजनेच्या नावाखाली केवळ ठाण्यात दादागिरी सुरु असून नागरिकांची फसवणूक होत आहे. पुढच्याच्या पुढच्या पिढीला क्लस्टरमध्ये घर मिळणार असेल तर, त्या योजनेचा काय फायदा असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.

घरे विकत घेणे परवडत नसल्यामुळे एकीकडे ठाणे, मुंबईमधील मराठी माणूस बाहेर जात आहे, या मराठी माणसाला पुन्हा ठाणे, मुंबईत आणण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. परंतू, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत ठाणे महापालिकेने शहराचा नवीन विकास आराखडा प्रसिद्ध केला. हा विकास आराखडा शहरातील अनेक प्रभागांना उध्वस्त करणारा असल्याचे समजताच हा विकास आराखडा आता, वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कळव्यातील सुदामा, त्रिमूर्ती, एनएम सोसायटी आणि सह्याद्री या अधिकृत इमारतीच्या परिसरातून रस्त्याचे आरक्षण या विकास आराखड्यात टाकले आहे. त्यामुळे या विकास आराखड्याला येथील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. गेली अनेक वर्षांपासून या परिसरात मराठी माणूस अस्तित्व टिकवून आहे. या सर्व सोसायटी अधिकृत असून मूठभर बिल्डारासाठी कळवा उध्वस्त करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप यावेळी स्थानिक नागरिकांनी केला. तर, नवीन विकास आराखडा बनवताना कोणत्याही प्रकारे अभ्यास करण्यात आलेला नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत निष्काळजीपणाने हा विकास आराखडा बनवला असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कळव्यातील जय त्रिमूर्ती सोसायटीची जागा बळकवण्यात आली असून त्या ठिकाणी बेकायदा व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. ही व्यायामशाळेवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने देऊनही पालिका प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. या भागातील स्थानिक नागरिकांनी वारंवार पालिका आयुक्तांना पत्रव्यवहार करून देखील बेकायदा व्यायामशाळा तोडण्यात येत नाही. यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करत, आयुक्त सौरभ राव यांनी पालिकेचे आयुक्त म्हणून काम करावे. एका राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून काम करू नये असा सल्ला दिला.