ठाणे : ठाण्यात वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. घोडबंदरमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांविषयी अनेक आंदोलने झाली. अनेक शासनाने निर्णय काढले. वाहतुक पोलीस रस्त्यावर दिसत नाहीत. पोलिसांकडे मनुष्यबळ नाही. परंतु यांच्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांना दोन-दोन अंगरक्षक दिले जातात. यांच्या भाजी आणणाऱ्यालाही अंगरक्षक देण्यात आल्याची टीका ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटावर केली.

मनसे आणि ठाकरे गटाने दावा केला आहे की, ठाण्यातील दररोजची वाहतूक कोंडी, पाणी टंचाई, बेकायदा बांधकामे, अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, क्लस्टर योजना झालेला फज्जा, काम न करता काढलेली बिले, वाढलेली गुन्हेगारी आदी प्रश्नांना ठाणेकर नागरीक अक्षरशः वैतागला आहे. या सर्वसामान्य ठाणेकरांना भेडसावणाऱ्या प्रश्नाच्या आणि ठाणे पालिकेच्या भ्रष्ट कारभार विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एल्गार पुकारला आहे.

येत्या सोमवारी (दि.१३ ऑक्टोंबर) ठाणे पालिकेवर मोर्चा काढणार आहे. या मोर्चाला राम गणेश गडकरी रंगातन येथून संध्याकाळी ४ वाजता सुरूवात होणार आहे. ज्या ठाणेकरांना आपले सुसंस्कृत ठाणे पुढे बघायचे आहे त्यांनी आपल्या कुटुंबासह या मोर्चात सहभागी व्हा असे आवाहन दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केले आहे.

पत्रकार परिषदेत राजन विचारे यांनी आरोप केला की, सध्या यांच्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांना दोन-दोन अंगरक्षक दिले जातात. यांच्याकडे भाजी आणणारे, स्वीय साहाय्यकांनाही अंगरक्षक देण्यात आले आहे. पोलिसांकडे मुनष्यळ नाही. परंतु येथे अंगरक्षक देण्यात आले आहेत असे विचारे म्हणाले. ठाणे महापालिका कर्जबाजारी झाली आहे. ठाण्यात समूह विकास योजना आणली आहे. पण योजना कुठे आहे, हा प्रश्न आहे. मेट्रोचे डबे रुळावर चढविले. परंतु त्याचे काहीच नाही झाले असा आरोप विचारे यांनी केला.

ठाणे महापालिकेचे नाव मिंधे शाखा करा

गेल्या ३ वर्षाच्या कालावधीत ठाण्याची काय अवस्था झाली हे ठाणेकरांना माहीत आहे. २०१७ साली पालिका निवडणुक झाली, मात्र अद्याप निवडणुका झाल्या नसल्याने प्रशासनावर वचक राहिलेला नाही. त्यामुळे वाटेल तसा कारभार सुरू असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी केला. सध्या ठाणे पालिकेकडे झाकण बदलण्यासाठी पैसे नाहीत. शासनाचा निधी आणावा लागतो, पण या निधीचा लेखाजोखा कुठेच नाही. पालिकेला स्थापन होवून ४३ वर्ष झाली, याचे गिफ्ट ठाणेकरांना त्याच दिवशी मिळाले आहे. त्यामुळे ठाणे पालिकेचे नाव बदला, आणि मिंधे शाखा करा अशी टीका यावेळी विचारे यांनी केली.