कल्याण – कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये दोन वेगळ्या घटनांमध्ये भरधाव वेगात असलेल्या दोन वाहनांनी दिलेल्या धडकेत दोन वृध्द नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये एका महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. याप्रकरणी खडकपाडा आणि रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात धीरज शेखर शेट्टी (३४) यांनी रिक्षा चालक रुकमदिन करीम शेख यांच्या विरुध्द तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार धीरज हे डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली गोपाळनगर गल्लीमध्ये राहतात. रिक्षा चालक रुकमदिन हे शेलारनाका भागात राहतात.
धीरज शेट्टी यांचे वृध्द वडील गुरुवारी रात्री साडे आठ वाजताच्या दरम्यान डोंबिवली पूर्वेतील टिळक चौक येथून शेलार नाका येथे पायी चालले होते. सावरकर रस्ता नाका येथे रस्ता ओलांडत असताना त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगात एक रिक्षा आली. रिक्षा चालक निष्काळजीपणे आणि हयगयीने रिक्षा चालवित होता. रिक्षा चालक रुकमदिन यांचे रिक्षेवरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा चालक रुकमदिन याने रिक्षेची धीरज यांच्या वडिलांना जोराची धडक दिली. या धडकेत धीरज यांच्या वडिलांच्या डोके, पाय, हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत म्हणून घोषित केले. डोंबिवली, कल्याणमधील बहुतांशी रिक्षा चालक प्रतिबंधित गुटखा तोंडात ठेऊन, गणवेश न घालता प्रवासी वाहतूक करत आहेत.
दुसरी घटना कल्याण जवळील मोहने येथे घडली. मोहने एनआरसी प्रवेशव्दारासमोर एक पादचारी महिलेला एक मोटार कार चालकाने जोराची धडक दिली. या धडकेत या महिलेचा मृत्यू झाला. या मृत्यूप्रकरणी या महिलेच्या भावाने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
लता एकनाथ कांबळे असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. मागील अनेक वर्षापासूुन त्या कल्याण पूर्वेतील नांदिवली भागात राहणाऱ्या आपल्या भावाकडे राहत होत्या. त्या बाजारपेठेत खरेदीसाठी एकट्या चालल्या होत्या. एनआरसी प्रवेशव्दारासमोरून जात असताना त्यांना एका मोटार कार चालकाने जोराची धडक दिली. त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना डाॉक्टरच्या सल्ल्याने शीव येथे लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
कागदपत्रांअभावी भरपाई नाही
लता कांबळे यांची आधारकार्ड, वास्तव्य अशी व्यक्तिगत ओळख देणारी कागदपत्रे नव्हती. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने लता यांचा मृतदेह त्यांचा विठ्ठल प्रभू यांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. अखेर स्थानिक नगरसेवकाने लता यांच्या भावाला परिचत असल्याचे आणि लता आणि मृतदेह ताब्यात घेणारे भाऊ बहिण असल्याचे पत्र दिल्यावर रुग्णालय प्रशासनाने लता यांचा मृतदेह त्यांच्या भावाच्या ताब्यात दिला. या महिलेचा भाऊ विठ्ठल प्रभू (६२) हे सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करतात.
लता यांची कोणतीही कागदपत्रे नसल्याने त्यांचा मोटार वाहन अपघाताची भरपाई मिळणार नाही. तसेच आपण वृध्दत्वामुळे धावपळ करू शकत नसल्याचे विठ्ठल यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे.