ठाणे : ठाणे शहरातील खोपट, बाटा कंपाउंड येथील डिस्ट्रिब्युटर कंपनीच्या गोदाम फोडीप्रकरणी ठाणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करत राजस्थान आणि मुंबई येथील तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून ठाणे, पुणे, नवी मुंबई आणि संभाजीनगरमधील एकूण सात घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले असून जवळपास ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या टोळीतील राजस्थानमधील महेंद्रकुमार थानाराम मेघवाल (२८), गणेश धुला पाटीदार (४७) आणि मुंबईतील राजेश उर्फ अण्णा बबन कदम (४७) या तिघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपींमधील मेघवाल याच्यावर मुंबई, ठाणे, गुजरात, वसई विरार, मध्यप्रदेशमधील अशा वेगवेगळ्या १४ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तसेच कदम याच्यावर मुंबई,पुणे, सातारा,रत्नागिरी अशा वेगवेगळ्या २४ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

खोपटच्या बाटा कंपाउंड येथील श्रीसिद्धनाथ मार्केटिंग नावाची डिस्ट्रिब्युटर कंपनीचा सिगारेट हा माप असलेले गोडावून फोडून घरफोडी करून ५१ लाखांचा मुद्देमाल १५ जुलै रोजी चोरीला गेला होता. याप्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास राबोडी पोलिस आणि ठाणे गुन्हे शाखा यांच्यामार्फत सुरू होता. याचदरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात चौघेजण निष्पन्न झाले.

तो धागा पकडून त्या गुन्ह्यात वापरलेले दुचाकी आणि टेम्पो पुढे आले. तसेच एक किलो मीटर अंतरावर तिसरे वाहन उभे केल्याचे निष्पन्न झाले. तसेच ते मिरारोड परिसरात गेल्याचे पुढे आल्यावर राबोडीमधील गुन्ह्यातील माल विक्री करण्यासाठी मदत करणाऱ्या पाचव्या आरोपीसह घरफोडी करणाऱ्या दुकलीला अशा तिघांना मोठ्या शिताफीने २९ जुलै रोजी अटक केली. महेंद्र मेघवाल आणि राजेश कदम या दोघांकडून २ लाख १० हजार रुपयांची रोख, चांदीचे चौरंग त्याच्यावरील चांदीचे गणपती- लक्ष्मी मूर्ती, मोबाईल फोन, दुचाकी आणि सिगारेट असा १० लाख ४० हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ते दोघे मुंबई परिसरात लॉजवर राहताना वारंवार लॉज बदलत होते. तसेच तपासात त्यांनी ठाणे,पुणे, नवीमुंबई आणि संभाजीनगर आशा परिसरात अशाच प्रकारे ०७ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्या ०७ घरफोडीच्या गुन्ह्यात महावीर जोरसिंग कुमावत, धर्मेश जैसुफभाई शिरोया, ब्रिजेश भवरलाल गुर्जर यांच्यासह केल्याचे तपासात समोर आले आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.