कल्याण : फेड बँकेच्या अंबरनाथ शाखेतील सोने कर्ज वितरण विभागातील ग्राहक संपर्क अधिकाऱ्याने बँक अधिकाऱ्यांना कसलही माहिती न देता, कायदेशीर परवानगी न घेता ग्राहकाने बँकेत कर्जाच्या बदल्यात तारण ठेवलेल्या २६ लाख ९० हजार रूपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केला आहे. बँकेतील या घटनेची माहिती मिळताच बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार केली.

पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्ज वितरण विभागातील ग्राहक संपर्क अधिकाऱ्याला अटक केली आहे. फेड बँकेचे क्षेत्रिय व्यवस्थापक महेश वळंजु यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बँकेतील कर्ज विषयक प्रकरणे हाताळणारे ग्राहक संपर्क अधिकारी सचिन अरूण काळण (२९, रा. पिंपळोली, ता. कर्जत, जि. रायगड) यांच्या विरुध्द तक्रार केली आहे. गेल्या महिन्यात ५ मे ते २६ मे २०२५ या कालावधीत फेड बँकेच्या अंबरनाथ शाखेत हा प्रकार घडला आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की संपर्क अधिकारी सचिन काळण यांच्याकडे बँकेतील सोने कर्ज विषयक विभाग होता. गेल्या महिन्यात एका ग्राहकाने कर्ज घेण्यासाठी २६ लाख ९० हजार रूपयांचे सोन्याचे दागिने फेड बँकेत तारण म्हणून ठेवले. .या सगळ्या प्रक्रिया काळण यांनी पार पाडल्या. कर्जाच्या बदल्यात बँकेकडे तारण ठेवलेल्या सोन्याच्या ऐवजाची बँकेतील वरिष्ठांनी चौकशी केली. त्यावेळी हा प्रकार उघडकीला आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्राहकाने बँकेत तारण म्हणून ठेवलेले सोन्याचे दागिने सचिन काळण यांनी बँकेच्या कायदेशीर परवानी शिवाय बाहेर घेऊन जाऊन स्वताच्या फायद्यासाठी वापरून त्याचा अपहार केला म्हणून बँक क्षेत्रिय अधिकारी महेश वळंजु यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून काळण यांना अटक केली आहे.पोलीस उपनिरीक्षक हासगुळे याप्रकरणाचा तपास करत आहेत.