कल्याण – कल्याण पूर्वेतील एका विकासकाकडे १५ लाख रूपयांची खंडणी दे, नाहीतर तुला मारून टाकीन, अशी धमकी देणाऱ्या कुख्यात गुंड नन्नू शहाचा पुतण्या सूरज शहा याला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने सूरजला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कल्याण पूर्वेतील बांधकाम व्यावसायिक किरण निचळ यांना सूरज शहाने धमकावले आहे. किरण निचळ यांनी यासंदर्भात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. तक्रारीतील माहितीप्रमाणे, कल्याण पश्चिमेत बांधकाम व्यावसायिक किरण निचळ यांनी कल्याण पश्चिमेत लक्ष्मी जिजाऊ सोसायटीच्या जुन्या इमारतीच्या पुनर्विकास करण्याचे काम घेतले आहे. या इमारतीचे पाडकाम आणि भंगार विक्री करण्याचे नियोजन बांधकाम व्यावसायिक निचळ यांनी अगोदरच करून ठेवले आहे. त्याप्रमाणे त्यांनी प्रस्तावित केलेल्या ठेकेदाराला जुनी इमारत पाडणे आणि भंगार घेण्याचे कंत्राट देऊन टाकले आहे.
परंतु, हे काम आपणास मिळावे म्हणून सूरज शहा प्रयत्नशील होता. त्याने गेल्या आठवड्यात किरण निचळ यांना मोबाईलवरून संपर्क केला आणि मी नन्नू शहाचा पुतण्या बोलतोय असे सांगितले. आणि आपण जिजाऊ सोसायटीच्या पुनर्विकासाचे जे काम घेतले आहे. ती इमारत तोडण्याचे काम आपणास द्यावे म्हणून गळ घातली. त्यावेळी निचळ यांनी बघू असे बोलून नंतर सूरज शहाच्या मोबाईलला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मात्र चिडलेल्या सूरज शहाने किरण निचळ यांना संपर्क केला.
आपणास हे काम देणार नसाल तर मला १५ लाख रूपये द्यावे लागतील. हे काम मला दिले पाहिजे नाहीतर, मला १५ लाख रूपये हवे आहेत. ते पैसे दिले नाहीस तर मात्र तुला मारून टाकीन, अशी धमकी दिली. कुख्यात नन्नू शहाच्या पुतण्याने धमकी दिल्याने बांधकाम व्यावसायिक किरण निचळ यांनी थेट कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन घडल्या प्रकाराची तक्रार केली.
सूरज कुख्यात नन्नू शहाचा नातेवाईक असल्याने आपल्या जीवाला धोका होऊ शकतो, अशी भीती किरण यांना वाटली. त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून सूरज शहाला अटक केली. त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सूरज शहाला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अनके वर्षानंतर प्रथमच कल्याण, डोंबिवलीत एका कुख्यात गुंडाच्या नातेवाईकाने एका विकासकाला धमकावल्याचे समोर आले आहे. असे प्रकार यापूर्वी नियमित होत होते. पण पोलिसांनी अशा गुन्हेगारांची पाळेमुळे उध्वस्त करून टाकल्याने या शहरांमधील डाॅक्टर, विकासक समाधानी आहेत.