कल्याण : येथील पश्चिमेतील आजमेरा सोसायटीत मराठी कुटुंबियांना केलेल्या मारहाण आणि हल्ला प्रकरणी पोलिसांच्या विशेष पथकांनी शक्रवारी दिवसभरात दोन जण ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील मंत्रालयीन अधिकारी अखिलेश शुक्ला यांनी शुक्रवारी त्यांची भूमिका मांडणारी दृश्यध्वनी चित्रफित समाज माध्यमांत सामायिक केली होती. या चित्रफितीच्या आधारे पोलिसांनी शुक्ला यांना टिटवाळा-शहाड भागातून ताब्यात घेतले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना अटक केले जाईल, अशी माहिती कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी येथे माध्यमांना दिली.

या प्रकरणात गुन्हा दाखल करताना हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची साहाय्यक पोलीस आयुक्त चौकशी करत आहेत. या प्रकरणात ते दोषी आढळून आले तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे उपायुक्त झेंडे यांनी माध्यमांना सांगितले. सुमित जाधव (२३), रंगा उर्फ दर्शन बोराडे (२२) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : मराठी भाषेचा मुद्दा बनवण्यात आला आहे, अखिलेश शुक्ला यांचा आरोप

अभिजित देशमुख यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या गुन्हा दाखल दहा जणांपैकी दोन जणांना विशेष पथकांनी ताब्यात घेतले आहे. या दोन जणांवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. यापुर्वीचे आणि आताचा गुन्हा यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांची चार विशेष पथके उर्वरित हल्लेखोरांचा शोध घेत आहेत, असे उपायुक्त झेंडे यांनी सांगितले. या गुन्ह्याचे स्वरूप आणि तपासात पुढे येणारी माहिती या अनुषंगाने गुन्ह्याची नवीन कलमे या प्रकरणात नोंदवली जाणार आहेत, असे उपायुक्त झेंडे यांनी सांगितले.

या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आजमेरा संकुल, योगीधाम व्यापारी संघटना, परिसरातील नागरिक, मनसे, उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, माय मराठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी उपायुक्त झेंडे यांच्याकडे केली आहे. या गुन्ह्यातील सहभागींंवर १०९ अंतर्गत कारवाई करावी, अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन केले जाईल, असा इशारा उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी पोलिसांना दिला आहे.

हेही वाचा : कल्याणमध्ये आजमेरा सोसायटीतील रहिवाशांची मंत्रालयीन अधिकाऱ्याच्या अटकेसाठी निदर्शने

अमेरिकनचा पाठिंबा

नोकरी-व्यवसायानिमित्त अमेरिकेत स्थायिक असलेले सनी पवार हे सुट्टीनिमित्त मुंबईत आले आहेत. पवार यांना कल्याणमध्ये मराठी व्यक्तिंवर हल्ला झाल्याचे समजताच, देशमुख कुटुंबियांना पाठिंंबा दर्शविण्यासाठी ते कल्याणमध्ये आले होते. महाराष्ट्रात मराठी माणसांवर हल्ला होत असेल तर ते वेदनादायी आहे. बाहेरून येणाऱ्यांनी येथे व्यवस्थित रहावे, असे पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण शहर सर्व समाज, धर्मियांना एकत्र घेऊन चालणारे शहर आहे. मराठीचा अवमान येथे खपवून घेतला जाणार नाही. या प्रकरणाचे राजकारण न करता या गुन्ह्यातील कठोर शिक्षा होईल यादृष्टीने पोलिसांनी तपास करावा.

विश्वनाथ भोईर (आमदार, कल्याण)