ठाकुर्लीतील बारा बंगला भागात डवरलेल्या २५० वृक्षांच्या मुळावर उठलेल्या विशेष रेल्वे सुरक्षा दलाच्या प्रयत्नांना पर्यावरणप्रेमी संघटनांनी सुरुंग लावला. हे वृक्ष तोडून टाकण्याचा दलाचा प्रस्ताव कल्याण-डोंबिवली पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत फेटाळून लावण्यात आला. दोन महिन्यांपासून वृक्षतोडीविरोधात आवाज उठवण्यात येत होता.
गेल्या वर्षी रेल्वे सुरक्षा बळाने आपल्या उपक्रमासाठी बारा बंगला भागातील ६३ झाडे तोडली होती. ही झाडे तोडण्यास पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली होती. ही झाडे तोडण्याची घटना ताजी असतानाच विशेष रेल्वे सुरक्षा बळाने पुन्हा मैदानासाठी बारा बंगला भागातील २५० जुनाट झाडे तोडण्याचा प्रस्ताव पालिकेकडे पाठवला होता. सुरुवातीला वृक्ष प्राधिकरण समितीने ही झाडे तोडण्यासाठी अनुकूल भूमिका घेतली होती. ही झाडे तोडण्यास स्थानिक नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी समितीच्या बैठकीत व बाहेरही कडाडून विरोध केला होता. या सततच्या दबावामुळे पालिका प्रशासन अडचणीत आले होते. भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी पालिका आयुक्त, महापौरांना एक पत्र लिहून ठाकुर्ली बारा बंगला भागातील हरितपट्टा, त्याचे महत्त्व, तेथील झाडे आणि त्या परिसराचा डोंबिवली परिसरातील नागरिकांना होणारा उपयोग याची माहिती देणारे सविस्तर पत्र दिले होते. डोंबिवलीतील नागरिकांना शुद्ध हवा मिळण्याचे बारा बंगला परिसर हा एकमेव भाग आहे. याउलट हा भाग पालिका प्रशासन, रेल्वेने एकत्रितरीत्या विकसित करून तेथे निसर्ग उद्यान तयार करावे, अशी भूमिका पाटील यांनी घेतली आहे. नगरसेवक श्रीकर चौधरी यांनीही झाडे तोडू नयेत अशी आग्रही मागणी केली होती. ‘रानवाटा’ संस्थेचे अनंत सोनावणे यांनीही ठाकुर्लीतील झाडे तोडण्यात येऊ नयेत यासाठी पालिका आयुक्तांशी संपर्क केला होता. झाडे तोडण्याचा निर्णय घेऊ नये यासाठी मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांनी पालिका प्रशासनाला आदेश द्यावेत अशी तयारी करण्यात आली होती.