karjat panvel railway line : ठाणे : मध्य रेल्वे मार्गावरील कर्जत रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा भार हळूहळू वाढू लागला आहे. या भागात नागरिकरण वाढत असतानाच काही वर्षांपूर्वी रेल्वेकडून या भागात पनवेल-कर्जत रेल्वे काॅरिडाॅर प्रकल्प तयार करण्यास सुरुवात झाली होती. अवघे पाच रेल्वे स्थानक या मार्गिकेवर असणार आहेत. परंतु आता हा प्रकल्प केव्हा पूर्ण होणार याच्या प्रतिक्षेत नागरिक आहेत.
कर्जत, खोपोली, भिवपूरी, नेरळ भागातून लाखो प्रवासी मुंबई, नवी मुंबईत कामानिमित्ताने जात असतात. कर्जत आणि खोपोली रेल्वेगाडीत प्रवाशांना प्रवेश करणे देखील कठीण होत असते. त्यामुळे वादाचे प्रसंग या रेल्वेगाडीत घडत असतात. पूर्वी सकाळी आणि सायंकाळीच या गाड्यांमध्ये गर्दी असत. परंतु मागील काही वर्षांमध्ये दुपारी देखील या गाड्यांमध्ये गर्दी असते.
रेल्वे विकास महामंडळाकडून कर्जत ते पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान काॅरिडाॅर निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एका अहवालानुसार, कॉरिडॉरचा ७९ टक्के भाग पूर्ण झाला आहे आणि मार्च २०२६ पर्यंत तो जनतेसाठी खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जत भागातून पनवेल गाठणे शक्य होणार आहे. पनवेल येथून नागरिकांना नवी मुंबई देखील गाठता येऊ शकेल. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील मोठा भार हलका होण्याची शक्यता आहे.
कसा आहे प्रकल्प
कर्जत आणि पनवेल दरम्यानचा हा २९.६ किलोमीटरचा मार्ग आहे. एकूण २,७८२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. या कॉरिडॉरमुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ अंदाजे ३० मिनिटांची बचत होईल. हा प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
स्थानके कोणती
या मार्गिकेवर एकूण पाच स्थानके उपलब्ध असणार आहेत. त्यामध्ये पनवेल, चिखले, मोहापे, चौक आणि कर्जत स्थानकांचा सामावेश असेल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, हा प्रकल्प पनवेल आणि कर्जत दरम्यानचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करेल, हा कॉरिडॉर पनवेल आणि कर्जत दरम्यान एक महत्त्वाचा उपनगरीय दुवा प्रदान करेल.
प्रकल्पाचे वेशिष्ट्ये
सध्या हा प्रकल्प ७९ टक्के पूर्ण झाल्याचे कळते आहे. एकूण मोठे नऊ पूल आणि ३५ लहान आकाराचे पूल मार्गिकेवर असतील. एक रेल्वे उड्डाणपूल, १५ भुयारी मार्गिका, तीन बोगदे या मार्गिकेवर असतील. भविष्यातील हा एक महत्त्वाचा प्रकल्प असून या प्रकल्पामुळे नव्याने निर्माण होणाऱ्या स्थानक परिसरात बाजारपेठा आणि दळणवळण अधिक प्रमाणात वाढेल.
