ठाणे – अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यसह ठाणे जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांकडून महत्त्वाचे कार्यक्रम रद्द केले जात असताना, विष्णुनगर भागातील मनसेच्या शाखेत राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी सायंकाळच्या सुमारास ढोल ताशांचा सुरू असलेला गजर अनेकांना बुचकळ्यात पाडणारा ठरला. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा डोंबिवलीत जाहीर मुलाखतीचा कार्यक्रम अपघाताचे वृत्त येतात स्थगित करण्यात आला. तसेच जिजाऊ संघटनेचे संस्थापक सांबरे यांचाही राजकीय प्रवेशाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसे नेत्यांचा उत्साह उसंडून वाहत असल्याचे पाहून ठाणेकरांनी आश्चर्य व्यक्त केले.
ठाण्यातील विष्णूनगर भागात मनसेची मध्यवर्ती शाखा आहे. या शाखेच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त आज मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे येणार असल्यामुळे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या स्वागताची जंगी तयारी केली होती. शहरातील प्रत्येक चौकात या राज ठाकरे येणार याची फलकबाजी करण्यात आली होती. तसेच विष्णू नगर परिसरात पक्षाचे ध्वज लावण्यात आले होते. मंडप उभारण्यात आला होता. त्यासह, विद्यूत रोषणाई देखील करण्यात आली होती. यासह,ठाणे जिल्ह्यात इतर देखील पक्षांचे विविध कार्यक्रम आयोजित होते. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा डोंबिवलीत जाहीर मुलाखतीचा कार्यक्रम तर, जिजाऊ संघटनेचे संस्थापक सांबरे यांचाही राजकीय प्रवेशाचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम होते.
परंतू, आज दुपारी अहमदाबाद येथे विमान दुर्घटना झाली. त्यात, अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. याची माहिती मिळताच, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा डोंबिवलीत जाहीर मुलाखतीचा कार्यक्रम आणि निलेश सांबरे यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम त्या त्या आयोजकांनी रद्द केला. मात्र, दुसरीकडे ठाण्यातील विष्णूनगर भागातील मनसेच्या शाखेत राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी सायंकाळच्या सुमारास ढोल ताशांचा गजर सुरु होता. राज ठाकरे यांचे स्वागत करताना मनसेच्या कार्यकर्त्यांचा उत्साह उसंडून वाहत असल्याचे दिसून आले. या सर्व प्रकारामुळे सर्वांनीच मनसेच्या या कार्यक्रमावर आर्श्चय व्यक्त केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विष्णूनगर भागातील मध्यवर्ती शाखेच्या वर्धापन दिना निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे ठाण्यात आले होते. राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची सध्या राजकीय चर्चा सुरु आहे. याबाबत राज ठाकरे काही बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र, यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही.