ठाणे – नवी मुंबईतील मतदार याद्यांमधील भोंगळ कारभार नवीमुंबईकरांना समजावा यासाठी मनसेच्या वतीने वाशी येथे ‘खोट्या मतदारांचे प्रदर्शन’ भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाला सर्वसामान्य नागरिकांसह निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून भाजपा नेत्यांनी देखील यावे अशी खोचक टीका मनसे नेत्यांनी केली आहे.

नवी मुंबईच्या मतदार यादीतील सुलभ शौचालय, पालिका आयुक्त निवास, पामबीच रोडनंतर आणखी अनेक घोळ समोर आले आहेत. मनसेने यावर वारंवार आवाज उठवला आहे. अनेकदा यासंदर्भात मनसेच्या नेत्यांनी पत्रकार परिषदा ही घेतल्या होत्या. तर, पक्षाच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी देखील नवी मुंबईतील या प्रकाराबाबत प्रश्न उपस्थित करुन निवडणूक आयोगावर टोला लगावला होता.

परंतू, निवडणूक अयोगाकडून यावर समाधनकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाचा हा भोंगळ कारभार नागरिकांना समजावा यासाठी मनसे नवी मुंबईचे अध्यक्ष गजानन काळे यांनी ‘खोट्या मतदारांचे प्रदर्शन’ आयोजित केले आहे. हे प्रदर्शन वाशी येथील सेक्टर ९ ए जवळील दैवज्ञ भवन सभागृहात शुक्रवार, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत खुले असणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन अमित ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. खोट्या मतदारांचे प्रदर्शन पाहण्यासाठी खऱ्या मतदारांनी यावे असे आवाहन गजानन काळे यांनी नवीमुंबईकरांना केले आहे.

गजानन काळे यांची भाजपवर टीका

निवडणूक आयोगाने सताधारी पक्षाप्रमाणेच वागायचे आणि त्यांच्या कलेने घ्यायच ठरवलं आहे तर, निवडणूक आयोगाचे अधिकारी, निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते असल्यासारखे आशिष शेलार आणि भाजपचे सर्व नेते त्यांनी सुद्धा या प्रदर्शनाला यावे आणि सर्वसामान्य मतदारांनी हे लक्षात ठेवाव या प्रदर्शनातून आपल्याला उत्तर मिळेल की, भारतीय जनता पक्षाला आणि निवडणूक आयोगाला निवडणूक घ्यायची घाई का झालेय, अशी खोचक टीका गजानन काळे यांनी केली आहे.