लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या साकेत आणि खारेगाव पूलाच्या दुरुस्तीचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) आठवड्याभरापूर्वी पूर्ण झाले आहे. या कामाच्या दुरुस्तीमुळे मागील आठवड्याभरापासून साकेत, खारेगाव पूलाच्या वाहतूक कोंडीतून ठाणेकरांना आता सुरळीत प्रवास अनुभवता येत असून सकाळी आणि रात्रीच्या कोंडीतून मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु मुंब्रा बाह्यवळण मार्ग सुरू झाल्यावरच येथील वाहतूक कोंडीविषयी अंदाज येऊ शकेल असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.

मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या साकेत आणि खारेगाव पूलावर एमएसआरडीसीकडून मास्टिक पद्धतीने दुरुस्तीचे काम केले जात होते. दरवर्षी पावसाळ्यात साकेत आणि खारेगाव पूलावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूकीवर त्याचा परिणाम होत होता. ठाणे शहर खड्डे मुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर एमएमआरडीकडून साकेत आणि खारेगाव पूलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. सुमारे दोन महिन्यांपासून टप्प्या-टप्प्याने ऐकेरी मार्गिका बंद करून येथील दुरुस्ती केली जात होती. या दुरुस्तीच्या कामांमुळे वाहन चालकांना नाहक वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागत होता. अनेकदा वाहनांचा भार वाढल्यास साकेत पूल ते माजीवडा पर्यंत वाहतूक कोंडी होत होती.

हेही वाचा… ठाणे महानगरपालिकेची विक्रमी कर वसुली, मालमत्ता करापोटी ६६ दिवसांत २०० कोटींची विक्रमी वसुली

साकेत आणि खारेगाव या दोन्ही पूलाच्या दुरुस्तीचे काम अखेर १ जून यादिवशी पूर्ण झाले आहे. ही कामे पूर्ण झाल्याने येथील वाहतूक अत्यंत सुरळीत झाल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे. दररोज सकाळी आणि रात्री असमान रस्ता, खड्डे यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाला असून अवघ्या पाच ते १० मिनीटांत खारेगाव पूल येथून माजिवडा गाठणे शक्य होत असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे. असे असले तरी मुंब्रा बाह्यवळण मार्ग अवजड वाहनांसाठी अद्यापही बंद आहे.

हेही वाचा… डोंबिवलीत विजयनगर सोसायटी भागातील काँक्रीटचा रस्ता खचला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून सुटणारी वाहने मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत, खारेगाव पूलावरून घोडबंदर, गुजरात तसेच भिवंडीच्या दिशेने वाहतूक करतात. मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून वाहतूक सुरू झाल्यानंतरच येथील वाहतूक कोंडीसंदर्भात अंदाज बांधता येणे शक्य असल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.