कल्याण – कल्याण शिळफाटा ररस्त्यावरील काटई निळजे रेल्वे उड्डाण पुलाची उद्घाटनंतर दोन महिन्यात दुर्दशा झाली. या पुलावर खड्डे पडल्याने प्रवाशी त्रस्त होते. कोट्यवधीचा रूपयांचा खर्च करून उभारलेल्या या पुलावर खड्डे पडल्याने हे खड्डे तात्काळ बुजविण्यात आले नाहीत तर जनआंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला होता. एमएसआरडीसीने या तक्रारीची गंभीर दखल घेत दोन दिवसात मध्यरात्रीच्या वेळेत या पुलावरील खड्डे मास्टेक अस्फाल्ट तंत्रज्ञाने भरले.
यासंदर्भात उपजिल्हाप्रमुख भगत यांनी लेखी पत्र एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले होते. दोन महिन्यापूर्वी कोट्यवधी रूपयांचा खर्च करून पलावा चौकाजवळील काटई निळजे रेल्वे उड्डाण पुलाचे उद्घाटन करण्यात आले. या नवीन पुलावर दोन महिन्यात खड्डे पडून या रस्त्याची दुरवस्था झाली. या पुलाच्या कामातील गैरव्यवहारामुळे पुलाची ही दुरावस्था झाल्याची टीका भगत यांनी केली होती.
काटई निळजे पुलावरील खड्ड्यांमुळे वाहने संथगतीने धावतात. पाऊस सुरू असेल तर हे खड्डे पाण्याने भरतात. त्यामुळे वाहनांचा वेग अधिक मंदावतो. त्यामुळे शिळफाटा रस्त्यावरील वाहन कोंडीत आणखी भर पडते, असे भगत यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले होते. बदलापूर, कल्याण, भिवंडी, डोंबिवली, उल्हासनगर परिसरातील अनेक नोकरदार याच रस्त्याने नवी मुंबई, पनवेल भागात दररोज सकाळी नोकरीच्या ठिकाणी जातात. संध्याकाळी शिळफाटा रस्त्याने घरी परततात. त्यांनाही काटई पलावा उड्डाण पुलावरील खड्ड्यांचा दररोजचा त्रास सहन करावा लागतो. अनेक प्रवासी, रिक्षा चालक, इतर खासगी वाहन चालकांना खड्ड्यात वाहने आपटून पाठ दुखी, मणका दुखीचे त्रास सुरू झाले आहेत, असे उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी सांगितले.
या पुलावर मोठा अपघात होईल त्यानंतर एमएसआरडीसी हे खड्डे बुजविणार आहे का, असे प्रश्न भगत यांनी केले होते. भगत यांच्या पत्रानंतर बुधवारी मध्य रात्री एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी काटई निळजे उड्डाण पुलावर खड्डे बुजविण्याच्या कामांना प्रारंभ केला. खडी-डांंबर मिश्रित मिश्रणाने हे खड्डे पहिले बुजविण्यात आले. गुरूवारी मध्यरात्री या खड्डे भरणीवर मास्टेक अस्फाल्ट मिश्रणाचा गुळगुळीत थर लावण्यात आला. मास्टेक अस्फाल्ट तंत्रज्ञानाने खड्डे भरल्यानंतर त्याच्यावर सततची वाहन वर्दळ, पाऊस यांचा कोणताही परिणाम होत नाही, असे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, मनसेचे नेते राजू पाटील यांनीही काटई निळजे उड्डाण पुलाला भ्रष्टनाथ पूल म्हणून नाव ठेवले होते. या पुलाच्या कामाच्या गुणवत्तेविषयी राजू पाटील यांनी शासनाकडे चौकशीसाठी तक्रारी केल्या आहेत.
महिनाभर काटई निळजे उड्डाण पुलावर खड्डे पडले होते. प्रवाशांची आदळआपट होत या पुलावरून प्रवास सुरू होता. पाऊस असला की पुलावर वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे खड्डे बुजविण्याची मागणी आपण एमएसआरडीसीकडे केली होती. त्याची तात्काळ दखल अधिकाऱ्यांनी घेतली. – राहुल भगत, उपजिल्हाप्रमुख, ठाकरे गट. कल्याण ग्रामीण.