कल्याण – मुंब्रा रेल्वे स्थानकातील प्रवाशांची वाढती गर्दी आणि कर्जत, कसारा, कल्याण, बदलापूर भागातून सीएसएमटी आणि कल्याणकडे धावणाऱ्या १५ डब्याच्या लोकलना मुंब्रा रेल्वे स्थानकात धीम्या, जलदगती रेल्वे मार्गावरील फलाटावर थांबता यावे यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मुंब्रा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक, दोन आणि तीन फलाटांच्या विस्ताराचे कळवा रेल्वे स्थानक बाजुने काम सुरू केले आहे. अतिशय युध्दपातळीवर हे काम करण्यात येत आहे.
दोन महिन्यापूर्वी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ एका वळणावर कल्याण सीएसएमटी जलदगती रेल्वे मार्गाजवळ कल्याणकडे जाणारी आणि सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल जवळ आल्याने दरवाजात उभे असलेले तेरा प्रवासी आणि त्यांच्या जवळील बॅगा एकमेकांवर आदळून रेल्वे मार्गात पडले होते. यातून मुंब्रा रेल्वे स्थानकातील प्रवासी गर्दीचा विषय पुढे आला होता.
मुंब्रा शहर परिसर पूर्व बाजुकडे शिळफाटा दिशेने विस्तारले आहे. कल्याण तालुका, नवी मुंबई शहर परिसरातील गावांमधील बहुतांशी नोकरदार मुंबई परिसरात नोकरीला जाण्यासाठी मुंब्रा रेल्वे स्थानकाला पसंती देतो. या रेल्वे स्थानकातील प्रवासी भार वाढला आहे. वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत मुंब्रा रेल्वे स्थानकातून जलदगती मार्गावरून धावणाऱ्या लोकल कमी संख्येने थांबतात. धिम्या मार्गावरून लोकल अगोदर प्रवाशांनी भरून येतात, अशी मुंब्रा रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तक्रार आहे.
दिवा शहर पूर्व, पश्चिम बाजुने विस्तारले आहे. वीस वर्षापूर्वी चार ते पाच प्रवासी उतरणाऱ्या आणि चढणाऱ्या दिवा रेल्वे स्थानकातून आता हजारो प्रवासी प्रवास करताना दिसत आहेत. या प्रवाशांच्या मागणीचा विचार करून जलदगती लोकलना दिवा रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आला आहे. कर्जत, कसारा, कल्याण, बदलापूर, आसनगाव भागातून सीएसएमटीकडे जलद, धिम्या मार्गावरून धावणाऱ्या लोकल कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांनी तुडुंब भरतात. त्यामुळे कोपर, दिवा, मुंब्रा, कळवा रेल्वे स्थानकातील प्रवाशांना लोकलमध्ये चढणे मुश्किल होते.
मुंब्रा रेल्वे स्थानकात सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये सकाळच्या वेळेत चढणे अवघड असल्याने मुंब्रा रेल्वे स्थानकातील अनेक प्रवासी डोंबिवली, कल्याण लोकलने उलट मार्ग प्रवास करून पुन्हा परतीचा प्रवास करतात. कल्याणकडून सीएसएमटीकडे धावणाऱ्या पंधरा डब्याच्या लोकलना मुंब्रा स्थानकात थांबा दिला तर या स्थानकातील प्रवाशांची घुसमट थांबणार आहे. हा विचार करून रेल्वे प्रशासनाने मुंब्रा स्थानकात कळवा बाजुने विस्तारिकरणाचे काम हाती घेतले आहे, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.
मुंब्रा रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी वाढली आहे. कल्याण, बदलापूरकडून येणाऱ्या लोकल खच्चून भरून येतात. त्यामुळे मुंब्रा स्थानकातील प्रवाशाला लोकलमध्ये नीट चढता येत नाही. यासाठी आपण रेल्वेकडे मुंब्रा स्थानकात १५ डबा लोकल थांबविण्याची सातत्याने मागणी करत होतो. या मागणीला आता यश आले आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात पंधरा डबा लोकल थांबण्यासाठी फलाट विस्ताराचे काम सुरू झाले आहे. – रफिक शेख, अध्यक्ष, मुंब्रा रेल्वे प्रवासी संघटना.