उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर जाहिरात फलक, होर्डिंग्ज तसेच बॅनर्स लावण्याच्या प्रकारांवर अखेर पालिकेने धडक कारवाईला सुरुवात केली आहे.
उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशांनंतरही शहरभर विनापरवानगी जाहिरातबाजी सुरूच असल्याचे दिसून आल्यानंतर प्रशासक तथा आयुक्त यांनी संबंधित विभागांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सहायक आयुक्तांनी दिलेल्या सूचनांनंतर संबंधित पथकांच्या मदतीने विविध ठिकाणी कारवाई करत एकूण १३ गुन्हे दाखल केले आहेत.
गेल्या काही वर्षात स्वस्त झालेल्या बॅनर आणि फलकबाजीमुळे विनापरवानगी चमकू नेते, पदाधिकाऱ्यांकडून बॅनर लावले जातात. निवडणूक वगळता अशा बॅनर, फलकांची कोणतीही परवानगी घेतली जात नाही. त्यात उल्हासनगर हे ठाणे जिल्ह्यातील सर्वात स्वस्त बॅनर छपाईची बाजारपेठ असलेले शहर आहे. येथून उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर ते थेट कर्जत, कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यातून बॅनर छपाई करून घेतली जाते. त्यामुळे शहरात हे तंत्रज्ञान स्वस्तात उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी केली जाते.
गेल्या काही दिवसांपासून पालिका निवडणुकांचे वेध अनेकांना लागले आहेत. त्यामुळे हौशी इच्छुकांनी कोणत्याही प्रसंगाला बॅनरबाजी सुरू केली आहे, परिणामी शहरात बेकायदा फलकबाजी वाढली आहे. जनहित याचिका क्रमांक १५५/२०११ मध्ये उच्च न्यायालयाने शहरात कोणत्याही प्रकारचा विनापरवानगी जाहिरात फलक लावला जाऊ नये, असे आदेश दिले होते. पालिकेने हे आदेश नागरिक, व्यापारी आणि सर्व राजकीय पक्षांच्या निदर्शनास वेळोवेळी आणून दिले होते. तरीसुद्धा विविध ठिकाणी अनधिकृत फलक व होर्डिंग्ज उभारले जात असल्याचे लक्षात आले.
त्यामुळे महापालिका आय़ुक्तांच्या आदेशानंतर अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेत प्रभाग समिती क्रमांक १ ते ४ अंतर्गत १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात उल्हासनगर पोलीस ठाण्यात ६, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात २, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात ३, हिललाईन पोलीस ठाण्यात २ असे एकूण १३ गुन्हे नोंदवले गेले आहेत. यामुळे बेकायदेशीर जाहिरात फलकबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
नियमित मोहीम सुरू राहणार
महानगरपालिका क्षेत्रात आता अशा प्रकारची बेकायदेशीर होर्डिंग्ज व फलक आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाईल, असे प्रशासक तथा आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे. सहायक आयुक्तांना दररोज पथके उतरवून अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहरातील सौंदर्य आणि शिस्त राखण्यास हातभार लागणार असून, नागरिकांनीसुद्धा अशा बेकायदेशीर जाहिरातींना पाठिंबा न देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.