ठाणे शहरात आठ ठिकाणी 'मियावाकी जंगल' शहराला हिरवेगार करण्यासाठी महापालिकेचा उपक्रम|municipal corporation initiative to green the city miyawaki forest at eight places in thane city | Loksatta

ठाणे शहरात आठ ठिकाणी ‘मियावाकी जंगल’; शहराला हिरवेगार करण्यासाठी महापालिकेचा उपक्रम

मियावाकी जंगल संकल्पनेत कमी जागेत जास्त वनस्पतीची लागवड करता येत असून पहिल्या टप्प्यात 3 हजार चौ. मी जागेत हे जंगल निर्माण करण्यात येणार आहे.

municipal corporation initiative to green the city miyawaki forest at eight places in thane city
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

ठाणे : वाढत्या शहरीकरणाबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन राखण्यासाठी नवी मुंबईच्या धर्तीवर ठाणे शहरात आठ ठिकाणी मियावाकी जंगल उभारण्यात येणार आहे. मियावाकी जंगल संकल्पनेत कमी जागेत जास्त वनस्पतीची लागवड करता येत असून पहिल्या टप्प्यात 3 हजार चौ. मी जागेत हे जंगल निर्माण करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक काम करणाऱ्या ग्रीन यात्रा या संस्थेच्या माध्यमातून सीएसआर निधीतून हे काम करण्यात येणार असून त्यामुळे महापालिकेवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

ठाणे महापालिकेतर्फ हाती घेण्यात आलेल्या स्वच्छता व सौंदर्यीकरणाच्या अभियानासोबतच शहरामध्ये हरित पट्टे निर्माण करण्याचा उपक्रम हाती घेतला जात आहे. कौपरखैरणे येथे निसर्ग उद्यान, ज्वेल ऑफ नवीमुंबई या ठिकाणी अशा प्रकारची शहरी जंगले उभारण्यात आली असून निश्चितच त्याचा पर्यावरणाला लाभ होत आहे. याच धर्तीवर ठाणे शहरात अशा प्रकारचे जंगल उभारण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ग्रीन यात्रा या संस्थेबरोबर मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीस उद्यान विभागाचे अधिकारी, तसेच ग्रीन यात्रा संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे शहराला येऊरसारखा जैव विविधतेने नटलेला निसर्गदत्त असा भूभाग लाभला आहे. परंतु वाढत्या शहरीकरणामुळे शहरातंर्गत झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यावर पर्याय म्हणून कमी जागेत जास्तीत जास्त वनीकरण करता यावे यासाठी मियावाकी जंगल उभारण्यात येणार आहे. यामुळे निश्चितच वाढत्या शहरीकरणाबरोबर पर्यावरणाचाही समतोल राखला जाईल अशी माहिती बांगर यांनी दिली.

हेही वाचा: ठाणे : भिवंडीत गोळीबारात एकाचा मृत्यू; दोन संशयित ताब्यात

सध्या जागेची वाणवा असली तरी मियावाकी ही झाडे लावण्याची अशी पद्धत आहे जिथे कमी जागेत जंगल निर्माण होऊ शकते. जिथे 6 चारचाकी गाड्या उभ्या राहतात इतक्या लहान ठिकाणात 300 विविध प्रकारची झाडे लावली जाऊ शकतात. आपल्या शहरात अशी लहान जागेतील जंगल तयार करण्यासाठी ‘ग्रीन यात्रा’ या पर्यावरणावर काम करणाऱ्या संस्थेने पुढाकार घेतला आहे. महापालिका क्षेत्रात वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाअंतर्गत विकसित केलेल्या जागेत देखील मियावाकी पध्दतीने झाडे लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यामध्ये हिरानंदानी मिडोज, वाघबीळ, सेंट्रलपार्क आदी विभागांचा समावेश करण्यात यावा असे निर्देश आयुक्त बांगर यांनी उद्यान विभागाला दिले आहे.

आठ ठिकाणी निश्चित

मियावाकी जंगल उभारण्यासाठी ठाणे शहरातील एकूण आठ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये निसर्गउद्यान मुल्लाबाग येथे 8 हजार चौ.मी, मोगरपाडा दुभाजक येथे 5 हजार चौ.मी, मोघरपाडा येथील आरक्षित मोकळा भूखंड ए येथे 7300 चौ.मी, प्लॉट बी येथे 1500 चौ.मी, कोपरी येथे 4700 चौ.मी. नागला बंदर येथे 1 हजार चौ.मी, तर पारसिक विसर्जन घाटाजवळ 3 हजार चौ.मी अशी एकूण 7.6 एकर जागा निवडण्यात आली आहे. सीएसआर निधीच्या माध्यमातून मियावाकी जंगल उभारत येणार असून यासाठी महापालिकेवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. तसेच झाडांची लागवड व तीन वर्षे देखभाल दुरूस्तीचा खर्च सदर संस्था करेल. तसेच या माध्यमातून निर्माण होणाऱ्या कार्बनक्रेडीटवरही महानगरपालिकेचा अधिकार राहणार असल्याचे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले आहे.

मियावाकी संकल्पना म्हणजे काय?

मियावाकी घनवन ही जपानी संकल्पना असून प्राध्यापक अकिरा मियावाकी यांनी जपानमध्ये हरितकरणाचा एक वेगळा आणि यशस्वी प्रयोग या मियावाकी पद्धतीचा वापर करून केला आहे. जगभरात ३ हजार ठिकाणी तीन कोटीहून अधिक झाडे या पद्धतीने लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, लागवडीनंतर दोन ते तीन वर्षांनी त्या ठिकाणी घनदाट जंगल तयार झाले. मियावाकी घनवन पद्धतीत पारंपारिक वृक्षारोपणाच्या तुलनेत झाडे दहापट जलद वाढतात आणि ही वने तीसपट अधिक दाट असतात याचबरोबर मियावाकी घनवनामध्ये शंभरपट जास्त जैवविविधता आढळते .या पद्धतीमध्ये पूर्णतः वैज्ञानिकरीत्या वृक्षारोपण केले जाते, देशी जातींचीच वृक्ष या वनांमध्ये लावली जातात.

हेही वाचा: ठाणे : डोंबिवलीत पदपथ खचून अवजड ट्रकचे चाक गटारात रुतले

यासाठी फॉरेस्ट सर्वे करून त्या परिसरातील देशी वृक्षांना अभ्यास करण्यात येतो व एका विशिष्ट पद्धतीने हि वृक्ष लावली जातात. या वृक्षारोपणासाठी माती परीक्षण करून मातीमध्ये आवश्यक असलेली पोषक घटक टाकले जातात. रासायनिक खते न वापरता संपूर्णत: सेंद्रीय पद्धतीने झाडांची लागवड केली जाते. दाट वृक्षारोपण जमिनीचे पाणी मोठ्या प्रमाणात राखून ठेवते आणि भू-जल पातळी वाढण्यास मदत करते . पर्यायाने हे जंगल पक्षी आणि कीटकांना आकर्षित तर करतेच सोबत वायु गुणवत्ता सुधारण्यास ही मदत करते. विशेष म्हणजे मियावाकी घनवने २ ते ३ वर्षात स्वतः आत्मनिर्भर होतात. अशी प्रकारची जंगले शहरी भागासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरत आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 10:55 IST
Next Story
ठाणे : भिवंडीत गोळीबारात एकाचा मृत्यू; दोन संशयित ताब्यात