ठाणे – मुंबईकरांची आणि उपनगरीय शहरांतील नागरिकांची मध्य रेल्वे ही जीवनवाहिनी मानली जाते. कमी खर्चिक आणि कमी वेळेत प्रवास व्हावा यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वे गाड्यांनी प्रवास करणे पसंत करतात. अशातच, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील नागरिकांनाही रेल्वेचे वेध लागल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सवाच्या देखाव्यात प्रस्तावित असलेली मुरबाड रेल्वे साकारण्यात आल्याचे दिसून येत आहे.
गणेशोत्सवामुळे सर्वत्रच नव चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासूनच उत्साहाने सर्वजण विविध संकल्पनांवर आधारित देखावे साकारण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून येत होते. मागील काही वर्षांपासून घरगुती तसे सार्वजनिक गणेशोत्सवात पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश देणारे देखावे साकारण्याकडे अनेकांचा कल असतो.
प्लास्टिक, थर्माकोल यांसारख्या प्रदूषण करणाऱ्या वस्तूंचा वापर टाळून नैसर्गिक साहित्य, कागद, जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करून सजावट करण्यास प्राधान्य दिले जाते. तर अनेकजण वास्तवात घडत असलेल्या घटनांचे देखावे देखील उभारतात. यामध्ये सामाजिक संदेश देणारे, सांस्कृतिक वारसा जपणारे असे विविध देखावे असतात. अशाचप्रकारे मुरबाड येथील डेहनोली गावातील हृतिक केंबारी या तरुणाने प्रस्तावित असलेली मुरबाड रेल्वेचा देखावा साकारला आहे. मुरबाड रेल्वेचे काम अद्याप झालेले नसले तरी भविष्यातील मुरबाड रेल्वे कशी असेल याचे चित्र त्याने देखाव्यातुन साकारल्याचे दिसून येत आहे.
कल्याण-आंबिवली-मुरबाड या २८ किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्गाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्यावतीने मान्यता देण्यात आली आहे. मात्र या रेल्वे मार्गाचे काम काही प्रमाणात झाले आहे. या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रलंबित असून निधी आणि तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प अद्याप पुर्ण झालेला नाही. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून मुरबाडकर रेल्वेच्या प्रतिक्षेत आहेत.
नेमका देखावा काय ?
डेहनोली येथील हृतिक केंबारी याने मुरबाड स्थानक उभारले आहे. यामध्ये एका बाजूस प्लॅटफॉर्म, काही माणसे, रेल्वे ट्रॅक, त्यावर आलेली मुरबाड लोकल गाडी, इंडिकेटर असे सर्व दृश्य देखाव्याद्वारे दाखवण्यात आले आहेत. आणि बाप्पा रेल्वे लवकर येऊ दे अशी प्रार्थना देखील करण्यात आलेली आहे.
मुरबाडकरांना लोकलचे वेध का ?
मुरबाड तालुक्यात अनेक गावे येतात. मुरबाड येथून कल्याणकडे जाण्यासाठी बस आणि खाजगी गाड्यांची सोय आहे. मात्र या प्रवासासाठी अनेकदा जास्त वेळ जातो. कल्याण येथून मुरबाडकडे येण्यासाठी आणि मुरबाड येथून कल्याणकडे जाण्यासाठी अनेकदा वेळेवर गाड्या उपलब्ध होत नसतात. त्यामुळे मुरबाड रेल्वे येथील प्रवाशांसाठी महत्वाची ठरणार आहे.