डोंबिवली : श्रावण महिना असल्याने शिळफाटा रस्त्यावरील खिडकाळेश्वर मंदिरात दर्शन घेऊन कोळेगाव येथील एक महिला रिक्षेने येत होती. रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदाराने या महिलेला इच्छित स्थळी न सोडता शुक्रवारी रात्री या महिलेचे अपहरण केले. तिला कोळेगाव जवळील निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी या रिक्षेचा पाठलाग करुन दोन्ही आरोपींना पकडले. यावेळच्या झटापटीत आरोपींनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले.
मानपाडा पोलीस ठाण्याचे हवालदार सुधीर हसे, अतुल भोई यांच्या सतर्कतेमुळे या महिलेची आरोपींच्या तावडीतून सुखरुप सुटका झाली. अन्यथा दोन्ही आरोपींनी पीडित महिलेला धारदार शस्त्राने गंभीर जखमी करुन तिच्यावर खूप अत्याचार केले असते, असे पोलिसांनी सांगितले. उसरघर येथील रिक्षा चालक प्रभाक भट्टु पाटील (२२), दिवा पूर्व येथे राहणारा वैभव राजेश तरे (१९) अशी आरोपींची नावे आहेत. तरे हा खतरनाक गुन्हेगार आहे. त्याच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा… भिवंडीत महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
पोलिसांनी सांगितले, शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास कोळगाव भागात राहणारी पीडित महिला खिडकाळी येथील शिवमंदिरात शिवशंभोचे दर्शन घेऊन घरी येत होती. श्रावण महिना असल्याने ती या मंदिरात गेली होती. शिळफाटा रस्त्यावरील खिडकाळी येथे रस्त्यावर रिक्षेची वाट पाहत उभी होती. तिच्या समोर एक रिक्षा येऊन उभी राहिली. त्यात एक प्रवासी होता. महिलेने कोळेगाव येथे जायाचे सांगितले. कोळेगाव सोडून रिक्षा पुढे निर्जन स्थळी जाऊ लागली. पीडित महिलीने मला कोळेगाव येथे उतरवा, तुम्ही कुठे चालले आहात, असा प्रश्न करताच रिक्षेत पाठीमागे पीडित महिले जवळ बसलेल्या प्रवाशाने महिलेचा तोंड दाबून तिला धारदार शस्त्राचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिली.
हेही वाचा… १६० किलोची महिला बेडवरुन पडली; कुटुंबाचे प्रयत्न निष्फळ, शेवटी.. ठाण्यातील ‘ही’ घटना चर्चेत
रिक्षा निर्जनस्थळी नेऊन रिक्षा चालकासह साथीदाराने महिलेला नग्न करुन तिचा विनयभंग आणि अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडिता त्यांना प्रतिकार करत होती. गस्तीवरील मानपाडा पोलीस ठाण्याचे हवालदार हसे, भोई यांना आपल्या समोरुन गेलेली रिक्षा रस्ता सोडून आड बाजुला चालकाने का नेली, असा संशय आला. या दोन्ही पोलिसांनी निर्जन स्थळी गेलेल्या रिक्षेचा पाठलाग केला. घटनास्थळी पोहचताच तेथे रिक्षा चालकासह एक जण महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. पोलिसांना पाहताच दोन्ही आरोपींनी जवळील धारदार शस्त्राने दोन्ही पोलिसांवर हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मदने यांना ही माहिती दिली. तात्काळ पोलिसांचे विशेष पथक घटनास्थळी मोटारी घेऊन आले. त्यांनी दोन्ही आरोपींनी अटक केली.
हेही वाचा… ठाण्यात दोन पनीर उत्पादकांवर कारवाई; ४ लाख १ हजार ३७४ रुपये किंमतीचे पनीर, दूध साहित्य जप्त
आरोपींनी आक्रमक विरोध करुनही दोन्ही पोलिसांनी आरोपींना पकडल्याच्या धाडसाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपींवर अपहरण, विनयभंग, अत्याचाराचे गन्हे दाखल केले आहेत.