वेगाने होत असलेल्या नागरीकरणामुळे ठाणे शहर मुंबई महानगर प्रदेशात केंद्रस्थानी आले आहे. मुंबईच्या पलीकडे ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कळवा या प्रदेशाची लोकसंख्या एव्हाना ३५ लाखाच्या पलीकडे पोहचली आहे. भिवंडी आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही वर्षांपासून नव्या ठाण्याची निर्मिती होत आहे, अशा पद्धतीने मोठी संकुले उभी राहत आहेत. एका अर्थाने नागरीकरणाच्या आघाडीवर या सगळ्या पट्टय़ाची मुंबईशी स्पर्धाच सुरू झाली आहे. ही स्पर्धा एकीकडे सुखावणारी भासत असली तरी वाढत्या लोकसंख्येमुळे दुसरीकडे सुरक्षेचे काही मूलभूत प्रश्नही या भागात उभे राहत आहेत. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सद्यस्थितीत उपलब्ध असलेले पोलीस दल अपुरे असल्याची ओरड नव्याने होऊ लागली आहे. या संपूर्ण पट्टय़ाला विस्तीर्ण असा खाडीकिनारा लाभला आहे. मुंबई-अहमदाबाद, मुंबई-नाशिक असे महत्त्वाचे महामार्ग या शहरांमधून जात आहेत. उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरातून दररोज शेकडोंच्या संख्येने अवजड वाहने भिवंडी परिसरातील गोदामांच्या दिशेने येऊन धडकत आहेत. यापैकी अध्र्याहून अधिक गोदामे बेकायदा असल्याने तेथे काय येते आहे, कोण आणतो आहे हे शोधण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा विकसित करावी लागणार आहे. फ्रान्सवरील अतिरेकी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर मुंबईसह देशभरात हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे. मध्यंतरी नागला बंदरात जिलेटीनचा साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. भिवंडीलगत असलेल्या पडघा या लहानग्या गावातून सिमी संघटनेचे काही पदाधिकारी पोलिसांनी पकडले होते. ही पाश्र्वभूमी पाहता सुरक्षा व्यवस्थेची काही नवे आव्हाने ठाणे आणि आसपासच्या शहरांना पेलावी लागणार आहेत.
उपाययोजना
जंक्शनवर कॅमेऱ्यांची नजर..
ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि शहरातील हालचालींवर बारीक नजर राहावी या उद्देशातून महापालिकेने शहरात सी सी टीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ‘स्मार्ट सिटी सव्‍‌र्हेलन्स’ या योजनेंतर्गत तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून सुमारे ४० कॅमेरे शहरात बसविण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात मुंबई-नाशिक महामार्गावरील आनंदनगर नाका, तीन हात नाका, नितीन कंपनी तसेच कॅडबरी या चार महत्त्वाच्या जंक्शनवरील १६ सीसीटीव्ही कॅमेरे वाहतूक शाखेने तयार केलेल्या अद्ययावत नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले आहेत.

विजेच्या खांबांवर सीसी टीव्ही
शहरातील वेगवेगळ्या भागांत सुमारे १५०० सीसी टीव्ही कॅमेरे बसवून हे संपूर्ण शहर पोलिसांच्या नियंत्रणाखाली आणले जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ठाण्यात वाहतूक पोलिसांच्या एका कार्यक्रमात केली. या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासंबंधी प्रशासनाने एक प्रस्ताव तयार केला आहे. यानुसार ठाणे, कळवा, मुंब्रा शहरातील सुमारे ४०० विजेच्या खांबांवर वाय-फाय यंत्रणा बसविण्यात येणार आहे. संबंधित ठेकेदारांकडून खाबांवर सुमारे ४०० सीसी टीव्हीकॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच महापालिकेची विविध कार्यालयेसुद्धा जोडण्यात येणार आहेत. हा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

तंत्रज्ञानाचा आधार
वाढती लोकसंख्या आणि त्यासोबत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत पोलीस बळ अपुरे पडत आहे. या पाश्र्वभूमीवर शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठाणे पोलिसांनी तंत्रज्ञानाचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. यातूनच ठाणे पोलिसांनी होप नावाचे अ‍ॅप्स विकसित केले असून ही सेवा नागरिकांसाठी खुली केली आहे. संकटात सापडलेल्या व्यक्तीला तात्काळ मदत मिळावी या उद्देशातून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. कोणत्याही अ‍ॅन्ड्रॉइड फोनवर सहजपणे डाऊनलोड करता येऊ शकेल. तसेच नागरिकांना त्याचा वापर कसा करावा हे सहज समजू शकेल, अशा स्वरूपाचे अ‍ॅप आहे.

अ‍ॅप डाऊनलोड कसे करावे.
प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरमध्ये ‘होप ठाणे पोलीस’ असे शोधावे. यानंतर हे अ‍ॅप डाऊनलोड करावे. डाऊनलोड होत असताना मोबाइल स्क्रीनवर नोंदणी अर्ज दिसेल. त्यामध्ये विचारलेली माहिती भरा. त्यानंतर पडताळणी क्रमांक विचारला जाईल. तो त्याच मोबाइलमध्ये संदेशद्वारे येईल. तो नोंद केल्यानंतर या अ‍ॅपचा वापर करता येऊ शकेल.

अ‍ॅपमधील सुविधा..
महिलांसाठी हेल्पलाइन, अँटी रॅगिंग, लहान मुलांसाठी हेल्पलाइन, रुग्णवाहिका सेवा, अग्निशमन सेवा, अपघात मदत, वाहतूक मदत, महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा, नैसर्गिक आपत्ती व सायबर गुन्हे अशा १४ प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहे. तसेच नागरिकांना आलेले विविध अनुभव शेअर करण्याची आणि अपेक्षित असलेल्या सूचना नोंद करण्याची सुविधाही यामध्ये देण्यात आली आहे. याशिवाय, पोलीस ठाण्याची माहिती व क्रमांकही देण्यात आले आहेत.