अंबरनाथ : कल्याण – अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये रायते पुलाजवळून अंबरनाथकडे जाणाऱ्या वाहनांचा थेट मार्ग बंद करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) घेतल्याने हजारो नागरिकांची गैरसोय होणार होती. स्थानिकांच्या मागणीनंतर अखेर महामार्ग प्राधिकरणाने हलक्या वाहनांसाठी स्वतंत्र रस्ता उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे रायते ते अंबरनाथ दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग ठाणे जिल्ह्यासह अहिल्यानगर, पुणे आणि त्यापुढील प्रवासासाठी महत्वाचा महामार्ग आहे. याच महामार्गाला जवाहरलाल नेहरू न्यास ते बडोदे महामार्ग छेदून जातो आहे. त्यामुळे या दोन्ही महामार्गांच्या विस्तारीकरणाचे आणि उभारणीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. उल्हास नदी ओलांडून हा महामार्ग जातो. रायते येथे उल्हास नदीवर नव्या पुलाची उभारणी केली जाते आहे. याच मार्गावरून कल्याण तालुका अंबरनाथ तालुक्याला जोडला जातो.

रायते ते अंबरनाथ दरम्यान आणे, भिसोळ, नालिंबी, वसत, जांभूळ अशी अनेक गावे असून या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सध्याचा रस्ता बंद करून नागरिकांना रायते येथील नव्या पुलावरून मोठे वळण घेऊन पुन्हा जुन्या पुलाजवळून अंबरनाथला पोहोचण्याचा पर्याय दिला होता.

हा निर्णय नागरिकांसाठी अत्यंत गैरसोयीचा ठरत होता. विशेषतः पावसाळ्यात जुन्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे मार्ग बंद होण्याची शक्यता होती. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर आणि कल्याणदरम्यानचा संपर्क तुटेल अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली होती. शिवाय जुन्या पुलाची दुरुस्तीकडे दुर्लक्ष होऊन भविष्यात मोठा अपघाताचा धोका निर्माण होईल, अशीही चिंता होती.

या परिस्थितीची दखल घेत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी थेट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता तृप्ती नाग आणि कंत्राटदार यांच्या प्रतिनिधींसह प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. या वेळी नागरिकांची मते जाणून घेऊन पाटील यांनी अधिकाऱ्यांसमोर ठामपणे मागणी केली की, रायते–पांजरापोळ येथून अंबरनाथकडे जाणाऱ्या छोट्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून द्यावी. त्यांच्या या आग्रहानंतर महामार्ग प्राधिकरणाने अखेर नवीन मार्गिकेला मंजुरी दिली आहे.

या निर्णयामुळे कल्याण – अंबरनाथदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. मुसळधार पावसातही नागरिकांचा संपर्क तुटणार नाही, ही मोठी सोय ठरणार आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत समाधान आनंद व्यक्त केले असून यावर तातडीने काम करावे असेही सूचवले आहे.