येऊरच्या जंगलात गोंगाट

पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असे क्षेत्र समजल्या जाणाऱ्या येऊरच्या जंगलात पुन्हा मोठय़ा आवाजाचे फटाके, ध्वनिक्षेपकांचा ढणढणाट सुरू झाला आहे.

फटाक्यांची आतषबाजी, पाटर्य़ा, ध्वनिक्षेपकांचा ढणढणाट

जयेश सामंत, किशोर कोकणे

ठाणे : पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असे क्षेत्र समजल्या जाणाऱ्या येऊरच्या जंगलात पुन्हा मोठय़ा आवाजाचे फटाके, ध्वनिक्षेपकांचा ढणढणाट सुरू झाला आहे. वन अधिकारी आणि पोलीस विभागाला चकवून सुरू असलेल्या या धांगडधिंग्यामुळे पर्यावरण प्रेमींमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेला येऊरचा जंगल परिसर पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील आहेच शिवाय बिबटे तसेच काही प्राणी, पक्षी, दुर्मीळ वनस्पतींमुळे पर्यावरण अभ्यासकांसाठी आकर्षणाचा केंद्रिबदूही आहे. गेल्या काही वर्षांपासून येथील भागात वन विभाग आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अनेक बेकायदा धाबे, हॉटेल आणि बंगले उभे राहिले आहेत. कोणतेही नियम न पाळता मनमानी पद्धतीने होणाऱ्या या बांधकामाकडे जिल्ह्यातील सर्वच शासकीय यंत्रणांनी नेहमीच दुर्लक्ष केले आहे. याठिकाणी काही बंगले पर्यटकांसाठी भाडय़ानेही दिले जातात. त्यामुळे मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरातून सुट्टीच्या दिवशी अनेकजण या ठिकाणी वास्तव्यासाठी येत असतात. काही ढाबे, उपाहारगृहे देखील या ठिकाणी आहे. सायंकाळच्या वेळेत या ढाब्यांवर मोठय़ा आवाजाचे संगीत वाजविले जाते. महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक येथील हॉटेलांमधील बेकायदा बांधकामांवर जुजबी कारवाई करत असते. हे प्रकार येथील बिबटे, इतर प्राणी-पक्ष्यांसाठी नक्कीच अनुकूल नाही असेही पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे.

ठाणे महापालिकेतील एका बडय़ा पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत गेल्या आठवडय़ात येऊरच्या एका बंगल्यावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी एका राजकीय नेत्याच्या नातेवाईकांच्या वाढदिवसानिमित्त घडला अशा तक्रारी पुढे येत आहेत.

ध्वनी आणि वायू प्रदूषणात वाढ

नोव्हेंबरपासूनच सुट्टय़ांच्या दिवसांमध्ये येऊरच्या जंगलात नागरिक गर्दी करू लागले आहे. काही मोठय़ा बंगल्यांमध्ये, उपाहारगृहाच्या परिसरात क्रिकेट तसेच इतर खेळांचे आयोजन केले जात आहे. त्यासाठी मोठय़ा टीव्ही स्क्रीन उभारल्या जात आहे. ध्वनिक्षेपकांवर मोठय़ा आवाजामध्ये संगीत लावले जाते. फटाके फोडले जात आहेत. त्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण जंगलाच्या आवारात वाढले आहे. प्राणी आणि पक्ष्यांना त्याचा त्रास होऊ शकतो, असे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. 

येऊरचा परिसर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह काही भाग प्रादेशिक वन विभाग आणि ठाणे महापालिकेच्या हद्दीत आहे.  हद्दीच्या वादातून या ठिकाणी कारवाईसाठी चालढकल होत आहे. तिन्ही विभागाने एकत्र येऊन विशेषत: ठाणे महापालिकेने याठिकाणी येऊन कारवाई करणे अपेक्षित आहे. रात्रीच्या आवाजामुळे बिबटय़ासारख्या प्राण्यामध्ये भीती निर्माण होते. तर इतर प्राण्यांनाही  गोंगाटाचा त्रास होत आहे.

रोहित जोशी, पर्यावरणवादी.

येऊरच्या जंगलात वेळोवेळी आमचे पथक कारवाई करत असते. फटाके फोडले जात असल्याचा प्रकार अद्याप आमच्या कानावर आलेला नाही. असे झाले तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

गणेश सोनटक्के, वन परिक्षेत्र अधिकारी, येऊर.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Noise forest yeoor environment ysh

ताज्या बातम्या