Accident : ठाणे : मुंब्रा बाह्यवळण मार्गावर सोमवारी ट्रकची दुचाकीला धडक बसल्याने तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. अफजल शेख (२३) हसन शेख (१९) आणि मोईनुद्दीन शेख (१९) अशी मृतांची नावे असून ट्रक चालक वाहन सोडून पळून गेला. या अपघाताची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

मुंब्रा बाह्यवळण मार्ग हा ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली शहारांना जोडणारा आहे. या मार्गावरून हजारो जड-अवजड वाहने दररोज वाहतुक करतात. उरण येथील जेएनपीए बंदरातून सुटणाऱ्या आणि गुजरात, भिवंडीच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे.

मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून सोमवारी दुपारी अफजल, हसन आणि मोईनुद्दीन हे एका दुचाकीवरून शिळफाट्याच्या दिशेने वाहतुक करत होते. ते दुचाकीने मार्गावरील गावदेवी मंदिर परिसरात आले असता, ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, तिघेही ट्रकच्या चाकाखाली आले. अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून तेथून पळून गेला.

घटनेची माहिती परिसरातील नागरिक, पोलिसांना मिळाल्यानंतर सर्वजण घटनास्थळी एकत्र आले. त्यांनी चाकाखाली अडकलेले मृतदेह बाहेर काढले. त्यांचे मृतदेह ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.