भिवंडीतील खाडीपार भागात शुक्रवारी पहाटे एक ३५ वर्षांची जुनी धोकादायक इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली दडपून एका ३७ वर्षांच्या व्यक्तिचा मृत्यू झाला. २२ वर्षांच्या एका तरुणाला ढिगाऱ्याखालून वाचविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. व्यापारी संकुल असलेल्या या दोन माळ्यांच्या इमारतीच्या तळ मजल्यावर व्यापारी गाळे, गोदाम आहेत. धोकादायक झालेली ही इमारत ३५ वर्षांपूर्वीची आहे. मजीद हबीब अन्सारी (३७) असे मृत व्यक्तिचे नाव आहे. अन्सारी (२२) हा तरुण वाचला आहे. त्याच्यावर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी पहाटे खाडीपार भागात इमारत कोसळल्याचा आवाज झाल्यानंतर परिसरातील रहिवासी जागे झाले. त्यांनी अग्निशमन दलाला कळविले. तात्काळ जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ढिगारा उपसण्याची कामे सुरू केली. ढिगारा उपसत असताना त्यांनी अन्सारीला वाचविले. इमारतीचा अवजड ढिगारा अंगावर पडल्याने मजीद अन्सारीला वाचविण्यात जवानांना यश आले नाही. त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
निजामपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी, पालिका, महसूल अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध जवानांकडून घेतला जात आहे. खाडीपार भाग हा सर्वाधिक वर्दळीचा परिसर आहे. कोसळलेल्या इमारत परिसरात नागरिकांची वर्दळ असते. दिवसा ही दुर्घटना घडली असती तर मोठा अनर्थ झाला असता, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.
हेही वाचा – ठाणे: उद्धव ठाकरे येण्याचे कळताच शिंदे गटाकडून आनंद आश्रम हायजॅकचा प्रयत्न
भिवंडी पालिका हद्दीत एकूण ५८९ अति धोकादायक, ४०० धोकादायक इमारती आहेत. मागील अनेक वर्षांपासून भिवंडीत दरवर्षी एकतरी इमारत कोसळते. त्यात जीवित हानी होते, असे रहिवाशांनी सांगितले. सप्टेंबर २०२० मध्ये धामणकर नाका येथे जिलानी इमारत कोसळली. या दुर्घटनेत ३८ रहिवाशांचा मृत्यू झाला. मागील चार वर्षांत इमारती कोसळून ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. ६७ जण जखमी झाले आहेत.