सकाळी सात ते सकाळी ९.३० वेळेत वसईला जाण्यासाठी तीन पॅसेंजर सुरू करण्याची प्रवाशांची मागणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भगवान मंडलिक, लोकसत्ता

डोंबिवली ते बोईसर ही सकाळी ५.५० ची पॅसेंजर गेल्यानंतर सकाळी ६ ते सकाळी १० वेळेत एकही पॅसेंजर दिवा, पनवेल येथून वसई दिशेने धावत नसल्याने ठाणे, डोंबिवली, बदलापूर भागातील नोकरदारांचे सर्वाधिक हाल होत आहेत. कर्जत, कसारा, बदलापूर, टिटवाळा, कल्याण, डोंबिवली, ठाणे भागातील वसई, डहाणू, विरार भागात नोकरी, व्यवसाय, उद्योग व्यवसायासाठी जाणारा बहुतांशी वर्ग डोंबिवली जवळील अप्पर कोपर रेल्वे स्थानकातून दिवा, पनवेलकडून येणाऱ्या पॅसेंजरने प्रवास करतो. या प्रवाशांना वेळेत पॅसेंजर नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

हेही वाचा >>> कल्याण : रेल्वेत नोकरी लावतो सांगून तोतया लोको पायलटकडून कल्याण मधील महिलेची फसवणूक

दादर, ठाणे येथून गर्दीतून प्रवास करण्यापेक्षा कर्जत, कसारा, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, ठाणे भागातील बहुतांशी प्रवासी, व्यावसायिक वसई, डहाणू, विरार, पालघर भागात जाण्यासाठी अप्पर कोपर रेल्वे स्थानकात येऊन दिवा, पनवेल येथून येणाऱ्या पॅसेंजरने वसई रोड भागात प्रवास करतात. सकाळी ५.५० वाजता डोंबिवली-बोईसर पॅसेंजर गेल्यानंतर सकाळी ६ ते सकाळी १० वेळेत अप्पर कोपर रेल्वे स्थानकातून वसई रोड भागात जाण्यासाठी एकही पॅसेंजर नसते. या चार तासाच्या कालावधीत ठाणे, बदलापूर, कर्जत, आसनगाव, कर्जत, कसारा, डोंबिवली, कल्याण, डोंबिवली भागातील प्रवाशांची तुडुंब गर्दी अप्पर कोपर रेल्वे स्थानकात होते. सकाळी १०.१९ वाजता पनवेल-वसई पॅसेंजर आल्यानंतर ही पॅसेंजर प्रवाशांची खचाखच भरुन जाते. अनेक वेळा ही पॅसेंजर वेळेत येत नाही. अनेक प्रवासी फलाटावरुन पॅसेंजरमध्ये चढणे शक्य नसल्याने रेल्वे मार्गात उतरुन उलट बाजुने डब्यात शिरतात.

तीन पॅसेंजरची मागणी

सकाळी सहा ते सकाळी १० या कालावधीत मध्य रेल्वेने दिवा, वसई किंवा कल्याण येथून वसई रोड रेल्वे स्थानकात जाण्यासाठी किमान दोन ते तीन पॅसेंजर सोडून प्रवाशांचे होणार हाल थांबवावेत, अशी मागणी या पॅसेंजरने नियमित प्रवास करणाऱ्या डोंबिवलीतील ॲड. सुनील प्रधान यांनी केली आहे. ठाणे, डोंबिवली, बदलापूर, टिटवाळा भागातील बहुतांशी नोकरदार वसई, डहाणू, विरार भागात कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी अप्पर कोपर रेल्वे स्थानकातून प्रवासाला प्राधान्य देतो. या स्थानकातून कार्यालयीन वेळ गाठण्यासाठी एकही पॅसेंजर नसल्याने नोकरदारांचा हिरमोड होत आहे. पनवेल, दिवा किंवा कल्याण येथून वसई रोडला जाण्यासाठी सकाळी साडे सात, आठ वाजता किंवा नऊच्या दरम्यान दोन ते तीन पॅसेंजरचे नियोजन मध्य रेल्वेने केले तर डोंबिवली, ठाणे परिसरातील नोकरदार, व्यावसायिकांनी वसई भागातील कामाच्या ठिकाणी योग्य वेळी पोहचणे शक्य होणार आहे, असे प्रवाशांनी सांगितले.

कामगारांचे हाल

भिवंडी परिसरातील कामण, खारबाव परिसरात कंपन्यांची माल साठवणूक केंद्र झाली आहेत. उद्योग व्यवसाय या भागात वाढत आहे. या भागात दळणवळणाच्या फारशा सोयी नाहीत. कल्याण येथून भिवंडी येथे जाण्यासाठी कल्याण बस आगारात सकाळच्या वेळेत एक किमीची प्रवाशांची बससाठी रांग असते. बस दुर्गाडी, कोन भागात वाहतूक कोंडीत अडकून वेळ वाया जातो. या बसने भिवंडी येथे जाऊन तेथून मग सहा आसनी रिक्षा, रिक्षेने कामगारांना कामाच्या ठिकाणी पोहचावे लागते. हा उलटा प्रवास टाळण्यासाठी नोकरदार पॅसेंजर प्रवासाला प्राधान्य देतात. या उलटसुलट प्रवासात महिलांचे सर्वाधिक हाल होतात, असे प्रवाशांनी सांगितले.

गुजरात, वापी भागात उद्योग, व्यवसायासाठी जाणारे बहुतांशी व्यापारी, उद्योजक पॅसेंजरने प्रवासाला प्राधान्य देतात. दिवा, पनवेल ते वसई दरम्यान पॅसेंजरची वारंवारिता नसल्याने प्रवाशांचे खूप हाल होत आहेत.

या मार्गाने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मध्य रेल्वेकडे दिवा-वसई मार्गावरील पॅसेंजर संख्या वाढविण्यासाठी चार वर्षापासून पाठपुरावा केला आहे. त्याला अधिकारी दाद देत नसल्याचे प्रवाशांनी सांगितले. या मार्गावर अपेक्षित महसूल मिळत नसल्याचे कारण रेल्वे अधिकारी पुढे करतात असे प्रवाशांनी सांगितले.

“ दिवा-वसई रेल्वे मार्गावर सकाळी साडे सात ते सकाळी १० वेळेत किमान दोन ते तीन पॅसेंजर मध्य रेल्वेने सुरू कराव्यात. या मार्गावरील प्रवासी संख्या वाढली आहे. त्याप्रमाणात पॅसेंजर वेळेत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वने या मार्गावरील पॅसेंजर वाढविल्या की त्यांच्या महसुलात वाढ होणार आहे.

ॲड. सुनील प्रधानप्रवासी, डोंबिवली

“ मी नियमित वसई भागात नोकरीला जाते. कार्यालयीन वेळ साडे नऊची असली तरी सकाळी ५.५० वाजता डोंबिवली रेल्वे स्थानकात पॅसेंजर पकडावी लागते. रेल्वेने सकाळी सात ते १० वेळेत पॅसेंजरची संख्या वाढवावी.”

ऐश्वर्या खेडकर – प्रवासी, बदलापूर

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers suffer for four hours as there is no train from diva panvel to vasai zws
First published on: 09-11-2022 at 12:19 IST