कल्याण – गेल्या काही महिन्याच्या काळात कल्याण शहर परिसरातील काही नागरिकांचे मोबाईल भुरट्या चोरट्यांनी लांबविले होते. काहींचे मोबाईल रिक्षा प्रवासात भुरट्या चोरांनी काढून घेतले होते. अशा सर्व मोबाईल चोरीच्या घटनांचा छडा लावून पोलिसांनी ते मोबाईल चोरट्यांकडून हस्तगत केले. हे सर्व मोबाईल संबंधित वापरकर्त्या नागरिकांना बुधवारी खडकपाडा पोलीस ठाण्यातील एका कार्यक्रमात परत केले.
कल्याण पूर्व, पश्चिमेतील पोलीस ठाण्यात गेल्या काही महिन्याच्या काळात मोबाईल चोरीच्या अनेक घटना घडल्या होत्या. याप्रकरणी खडकपाडा, महात्मा फुले पोलीस ठाणे, बाजारपेठ, कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. वाढत्या मोबाईल चोरीच्या घटना पाहता अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी स्थानिक पोलीस ठाण्यांना विशेष पथके स्थापन करून मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशाप्रमाणे मागील काही महिन्यांपासून विशेष पथके सीईआयआर या तांत्रिक माहितीच्या आधारे मोबाईल चोर आणि चोरीला गेलेले मोबाईल यांचा शोध घेत होते. या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीतून चोरीला गेलेले सहा लाखाचे २५ मोबाईल, महात्मा फुले पोलीस ठाण्यातील दीड लाखाचे २५ मोबाईल, कोळसवाडी पोलीस ठाणे हद्दीतील अडीच लाखाचे १५ आणि बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील एक लाखाच्या सात मोबाईलचा छडा लावण्यात यश मिळविले.
चोरट्यांनी या चोरीच्या प्रकरणात पादचाऱ्यांमधील ज्येष्ठ नागरिक, वृध्द, बँकेतून बाहेर पडणारे नागरिक यांना सर्वाधिक लक्ष्य केल्याचे पोलिसांना आढळले. चोरट्यांनी हे मोबाईल स्थानिक रहिवासी, दुकानदार, गरजू यांना कमी किंमतीत विकले होते. हे सर्व मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. या मोबाईलधारकांची ओळख पटवून त्यांना बधुवारी खडकपाडा पोलीस ठाण्यातील कार्यक्रमात हे मोबाईल परत केले. यामधील अनेक मोबाईल महागडे होते. एका साधू महंताचाही चोरीला गेलेला मोबाईल सापडला आहे.
मोबाईल चोरीला गेल्यापेक्षा त्यामधील इतर नागरिकांचे स्थापित केलेले मोबाईल क्रमांक गेल्याने या नागरिकांमध्ये अस्वस्थता होती. पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल शोधून दिल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यापुढे सोनसाखळ्या, सोने ऐवज चोरीच्या गुन्ह्यांचा अशाच प्रकारे विशेष शोध मोहिमा घेऊन शोध घेतला जाणार आहे. अलीकडे सोनसाखळी चोरांची संख्या वाढल्याने पोलीस प्रशासन या शोध मोहिमेचा विचार करत आहे.