डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील दिवा-वसई रेल्वे मार्गावरील मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटकातील रस्त्यावर आणि दोन्ही बाजुच्या पोहच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रेल्वे फाटकात वाहन चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागते. रेल्वे फाटकातून वाहने खड्ड्यांमुळे संथगतीने चालविली जातात. त्यामुळे या भागात दररोज वाहतूक कोंडी होत आहे.

मागील वर्षी रेल्वे फाटकात खड्डे पडल्यानंतर रेल्वेच्या ठेकेदाराने बारीक खडी आणून टाकली होती. त्यामुळे खड्डे बुजण्याऐवजी या खडीत वाहनांचे टायर रूतून बसत होते. दुचाकी स्वार या खडीवर घसरून पडत होते. या खडीमुळे दुचाकी स्वार घसरून पडून जखमी होऊ लागल्यानंतर प्रवाशांकडून रेल्वेच्या कारभारावर टीका करण्यात आली. त्यानंतर या रेल्वे फाटकातील खडी काढून टाकण्यात आली होती.

दरवर्षीप्रमाणे मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटकात खड्डे पडले आहेत. हे खड्डे आणि त्याच्या लगतचे रूळ भराव नसल्याने उघडे पडले आहेत. त्यामुळे या रूळांवरून वाहने नेताना टायर घसरत असल्याच्या तक्रारी वाहन चालकांकडून करण्यात येत आहेत. कल्याण, डोंबिवलीतून मुंबई, ठाण्यात जाण्यासाठी आणि शिळफाटा, भिवंडी बाह्य वळण रस्त्याची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बहुतांशी प्रवासी अलीकडे डोंबिवलीतून माणकोली उड्डाण पूल मार्गे प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे फाटकातून धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे.

सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या नोकरदार आणि संध्याकाळी कामावरून परतणाऱ्या नोकरदारांची सर्वाधिक वर्दळ या रस्त्यावर असते. माणकोली पुलाकडील सुरई, पिंपळास भागात अनेक गृहसंकुलांमध्ये कुटुंब राहण्यास आली आहेत. त्यांची बाजारपेठ डोंबिवली असल्याने रिक्षा, खासगी वाहन चालकांची या रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे. ही सर्व वाहने मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटकात आली की खड्ड्यांमुळे संथगतीने धावतात. दरम्यानच्या काळात रेल्वे फाटक बंद होण्याची वेळ आली की दोन्ही बाजुची वाहने पुन्हा मेल, एक्सप्रेस जाईपर्यंत दोन्ही बाजुला अडकून पडतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेतीबंदर चौक ते रेल्वे फाटक रस्ता अरूंद आहे. या अरूंद रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असल्याने हा रस्ता रेल्वे फाटक बंद असले की वाहतूक कोंडीत अडकतो. वाहनांच्या रांगा उमेशनगर, सम्राट चौक दिशेने जातात. रेल्वे फाटकातील वाढते खड्डे आणि त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास विचारात घेऊन ठाकरे गटाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र लिहून मोठागाव रेल्वे फाटकातील खड्डे तातडीने बुजवावेत अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

रेल्वे प्रशासनाने या भागातील वाहतुकीचे नियोजन करून, खड्डे भरण्याच्या कामासाठी या भागातील अन्य मार्गाने वळविण्याच्या दृष्टीने स्थानिक महापालिका, वाहतूक विभागाला कळविले जाईल. त्यानंतर रेल्वे फाटकातील खड्डे, दोन्ही बाजुच्या पोहच रस्त्यांची कामे येत्या आठवड्यात पूर्ण केली जातील, असे आश्वासन जिल्हाप्रमुख म्हात्रे यांना दिले आहे.