डोंबिवली : ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकातील रेल्वे तिकीट खिडक्या सकाळच्या वेळेत बंद राहत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. तिकीट खिडकी बंद असली तर प्रवाशांनी बाजुच्या स्वयंचलित तिकीट सयंत्रावरून तिकिटे काढावीत अशी सूचना रेल्वे प्रशासनाने ठाकुर्ली जिन्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावली आहे. परंतु, ही स्वयंचलित तिकीट सयंत्र लोखंडी जाळीच्या कोठडीत कुलूप लावून बंद असतात. त्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होत आहे.
मागील काही महिन्यांपासून हा रेल्वे तिकीट खिडकी बंद राहत असल्याचा प्रकार ठाकुर्ली रेल्वे स्थानकात घडत आहे. रेल्वे अधिकारी यासाठी मनुष्यबळ कमी असल्याचे कारण देत आहे, असे प्रवाशांनी सांगितले. रेल्वे तिकीट खिडकी बंद म्हणून एखाद्या प्रवाशाने विनातिकीट रेल्वे प्रवास केला तर रेल्वे तिकीट तपासणीस त्या प्रवाशाला दंड ठोठावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या मनस्तापाला जबाबदार कोण, असे प्रश्न प्रवासी करत आहेत.
डोंबिवली जवळील ठाकुर्ली, चोळे, ९० फुटी रस्ता परिसरात नवीन गृहसंकुले उभी राहिली आहेत. याठिकाणचा बहुतांशी रहिवासी हा नोकरदार वर्ग आहे. सकाळच्या वेळेत ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून ठाणे, मुंबई, नवी मुंबईत जाणारे महाविद्यालीयन विद्यार्थी, प्रवासी प्रवास करतात. काही नवखे प्रवासी, व्यापारी तिकीट काढण्यासाठी ठाकुर्ली रेल्वे स्थानकात आलेले असतात. काही प्रवाशांना रेल्वे पास काढायचे असतात. पण रेल्वे तिकीट बंद पाहून त्यांचा हिरमोड होत आहे.
काहीजण विना तिकीट रेल्वे प्रवास करून दंडाला सामोरे जाण्यापेक्षा डोंबिवली रेल्वे स्थानकात येऊन तेथून पुढचा प्रवास करतात. ठाकुर्ली पूर्व भागात प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वेने नवीन तिकीट घर सुरू केले आहे. दिवस, रात्र याठिकाणी प्रवाशांच्या सेवेसाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. परंतु, सकाळच्या कामावर जाण्याच्या वेळेत याठिकाणी रेल्वे तिकीट खिडकी कुलुपबंद राहत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. तिकीट खिडकी बंद म्हणून प्रवासी स्वयंचलित तिकीट सयंत्रावरून तिकीट काढण्याचा प्रयत्न करतात. ही खिडकीही सुरक्षेच्या कारणासाठी कुलुपबंद करून ठेवलेली असते, असे प्रवाशांनी सांगितले.
महिन्यातून अनेक वेळा असे प्रकार घडत आहेत. ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढताना गर्दी कमी असते. त्यामुळे डोंंबिवलीतील प्रवासी अनेक वेळा गर्दीच्या डोंबिवली रेल्वे स्थानकात न जाता मुंबईतील प्रवासासाठी ठाकुर्ली रेल्वे स्थानकात येतात. तेथून प्रवास सुरू करतात. काही दिव्यांग, व्याधीग्रस्त, अंध ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून प्रवासाला सर्वाधिक पसंती देत असल्याची माहिती आहे. या रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्या सकाळच्या वेळेत बंद राहत असल्याने विशेष प्रवाशांची कुचंबणा होत आहे.