कल्याण – आमचे दैवत धर्मवीर आनंद दिघे यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांना ते दिसतील तेथे चपलेने मारले जाईल, असा इशारा शुक्रवारी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी कल्याण पूर्व येथे संजय राऊत यांच्या प्रतिमा दहन कार्यक्रमात दिला.
मुसळधार पाऊस सुरू असताना शिवसैनिक अधिक संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या. शिवसेनाप्रमुखांच्या तसबिरीजवळ जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या प्रतिमा लावल्यामुळे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी याविषयी बेताल वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरून शिंदे शिवसेनेच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शुक्रवारी दिवसभर कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागात निषेध आंदोलने केली.
संजय राऊत यांच्या प्रतिमा असलेले फलक घेऊन शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उभे राहून राऊत यांच्या निषेधाच्या घोषणा देत होते. संजय राऊत यांचा कापडी पुतळा तयार करून तो रस्त्यावर जाळण्यात आला. यावेळी मोठ्याने ओरडत शिवसैनिकांनी आक्रोश केला. संजय राऊत यांनी कोपऱ्यातील खोलीत बसून बेताल वक्तव्य करण्यापेक्षा जाहीर व्यासपीठावर येऊन असे काही बोलावे म्हणजे त्यांना शिवसैनिकांची ताकद काय आहे ते कळेल. संजय राऊत यांनी खुल्या चर्चेला यावे. त्यावेळी शिवसैनिक त्यांच्या बरोबर खुल्या चर्चेत सहभागी होतील.
कोणत्याही प्रकारची तेढ निर्माण करण्याचे काम राऊत यांनी करू नये. ते असेच वक्तव्य करीत राहिले तर मात्र त्यांना शिवसैनिक ते दिसतील तेथे चपलेने मारल्या शिवाय राहणार नाहीत, असा इशारा महेश गायकवाड यांनी दिला.
ठाकरे गटाची टीका
डोंबिवलीत संजय राऊत यांचा निषेध करताना आमदार राजेश मोरे यांनी जीभ घसरून राऊत यांचा उल्लेख केला. त्यामुळे संतप्त झालेल्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आमदार राजेश मोरे यांच्यावर टीका केली आहे. आमदार राजेश मोरे हे नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकत नव्हते. ते चुकीने आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आपली पायरी ओळखून जबाबदारीने बोलावे.
आपण लोकप्रतिनिधी आहोत याचे भान ठेवावे, अन्यथा ठाकरे गटाचे शिवसैनिक त्यांना प्रसाद दिल्या शिवाय राहणार नाहीत, असा इशारा डोंबिवलीतील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी दिला आहे. या आव्हान प्रति आव्हानांमुळे स्थानिक पातळीवर तणावाचे वातावरण आहे.