ठाणे : ठाणे जिल्हा परिषद एकीकडे स्मार्टच्या दिशेने वाटचाल करत असतानाच, दुसरीकडे ग्रामीण भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यात जिल्हा परिषदेला अपयश मिळत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सद्यस्थितीला ९२ तीव्र आणि १ हजार १२३ मध्यम कुपोषित बालके असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. कुपोषण कमी करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर विविध योजना राबविल्या जात असतानाही या योजनांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

ठाणे जिल्हा परिषद गेले वर्षभरापासून आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शानाखाली विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. तसेच शैक्षणिक क्षेत्रात देखील कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा वापर करुन जिल्हा परिषद उत्तम कामगिरी बजावत आहे. जिल्हा परिषदेच्या कामकाजाला गती मिळावी यासाठी ई-प्रणाली पद्धत १०० टक्के आमलात आणली आहे. त्यामुळे एकीकडे जिल्हा परिषदेचा कारभार गतीमान आणि स्मार्ट होत असला तरी, मात्र ग्रामीण भागातील बालकांचे कुपोषण कमी करण्यात जिल्हा परिषदेला अपयश मिळत असल्याचे दिसत आहे.

ठाणे ग्रामीण भागातील कुपोषण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून समुपदेशन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार असा त्रिसुत्री कार्यक्रम राबविण्यात येत होता. त्यासह, दत्तक पालक बालक योजना, तसेच मुंबई आयआयटी यांसारख्या नामांकित संस्थाचा सहभागाने बालकांची काळजी घेण्यासाठी व्हिडीओ मार्फत तसेच पालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत होती. तर, गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर मातांना व सहा महिन्यांनंतर बालकांना नियमितपणे अंगणवाडी सेविकांमार्फत पोषण किट वाटप करण्यात येते, असे विविध योजना राबवूनही जिल्ह्यात कुपोषित बालकांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत नसल्याची बाब समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यात सद्यस्थितील तीव्र कुपोषित बालकांची संख्या कमी असली तरी मध्यम कुपोषित बालकांची संख्या हजारांच्या वर आहे. त्यामुळे जिल्हा कुपोषण मुक्त होण्यास आणखी किती दिवस लागणार असा प्रश्न आता समोर निर्माण होत आहे.

गेल्या वर्षभराचा कुपोषणाचा अहवाल

ठाणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात कुपोषणाच्या आकड्यात चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. गेले वर्षे भरापासून तीव्र कुपोषित बालकांची संख्या १०० च्या आतमध्ये असली तरी त्यातही फार घट झालेली नाही. तर, मध्यम कुपोषित बालकांची संख्या गेले वर्षभरापासून हजाराच्या वर असल्याचे दिसत आहे. एप्रिल (२०२४) मध्ये तीव्र ९३ – मध्यम १०३८, मे तीव्र ९५ – मध्यम १०५९, जून तीव्र १०३ – मध्यम १०६९ जूलै तीव्र १०० – मध्यम १०८४ ऑगस्ट तीव्र १०० – मध्यम १०८५, सप्टेंबर तीव्र ८८ – मध्यम १०२३, ऑक्टोबर तीव्र ७६ – मध्यम १००९, नोव्हेंबर तीव्र ६६ – मध्यम ९६१, डिसेंबर तीव्र ८७ – मध्यम १०६१, जानेवारी २०२५ तीव्र ८१ – मध्यम ११४७ फेब्रुवारी तीव्र ८३- मध्यम १०९९ मार्च तीव्र ९२ मध्यम ११२३ ही आकडेवारी जिल्हा परिषदेतून मिळालेल्या अहवालातून स्पष्ट होत आहे.

मार्च २०२५ तालुकानिहाय्य कुपोषित बालकांची आकडेवारी

तालुका तीव्र मध्यम

शहापूर ४५ ५१८

मुरबाड ०९ १७३

भिवंडी २९ २९५

अंबरनाथ ०४ ४६

कल्याण ०५ ९१

एकूण ९२ ११२३

ठाणे जिल्ह्यातील तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांची संख्या कमी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अतिरिक्त आहार देणे, वारंवार आरोग्य तपासणी करणे तसेच विविध योजनांच्या माध्यमातून बालकांना सुविधा पुरविल्या जात आहेत. ग्रामीण भागात बालविवाह होण्याचे प्रमाण जास्त आहे त्यामुळेच कुपोषणाचे प्रमाण देखील वाढते. बालविवाह रोखण्यासाठी गावागावांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांमध्ये सामाजिक जाण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे लवकरच तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांच्या संख्येत घट होईल.-संजय बागुल, महिला बालविकास विभाग प्रमुख ठाणे जिल्हा परिषद