डोंबिवली – दृष्टी दोष असुनही त्यावर मात करत, डोंबिवलीतील टिळकनगर शाळेतील शार्दुल संतोष औटी या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत ९७.८० टक्के गुण मिळविले आहेत. टिळकनगर शाळेत प्रथम येण्याचा मान त्याने पटकावला आहे. दिव्यांग असुनही एवढे घवघवीत यश मिळविल्याबद्दल शार्दुलचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.

वयाच्या तिसऱ्या वर्षापासून शार्दुल औटी याला दृष्टी दोषाचा त्रास आहे. त्याच्या डोळ्यावर या आजारामुळे दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्याने जिद्द, चिकाटीने, अथक परिश्रम करून हे यश मिळविले आहे. अनेक दिव्यांग विद्यार्थी परीक्षेच्या काळात साहाय्यक विद्यार्थ्याची मदत घेतात. पण शार्दुलने अशी कोणतीही सवलत न घेता स्वसामर्थ्याने ही परीक्षा दिली आहे. स्वबळावर आणि स्वकर्तृत्वावर त्याची ही परीक्षा देण्याची इच्छा होती, असे त्याचे कुटुंबीय सांगतात.

कुटुंबीय, शाळा शिक्षक, शाळा व्यवस्थापन यांचे अमूल्य सहकार्य, मार्गदर्शन आपणास वेळोवेळी अभ्यासाच्या वेळी मिळाले. आपली अभ्यासातील मेहनत यासाठी कामी आली, असे शार्दुल सांगतो. शार्दुल पुढील शिक्षण विज्ञान शाखेतून पूर्ण करणार आहे. आयआयटीतून संगणक अभियांत्रिकी हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची इच्छा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुर्बल घटकातील मुलांचे यश

कल्याणमधील आधारवाडी कचराभूमी येथे कचरा वेचक म्हणून काम करणाऱ्या कचरा वेचकांच्या मुलांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या क्षमतेने दहावीच्या परीक्षेत चांगले यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांची जिद्द, प्रेरणा इतर अनेक मुलांना प्रेरणादायी आहे. गौरी सोनवणे ६३ टक्के, श्रध्दा सोनवणे ६५ टक्के, अर्चना घुले ५१ टक्के, कुणाल उकांडे ६० टक्के, दीपक जगताप ४६ टक्के अशी गुणवंत विद्यार्थ्यांची नावे आहेत. कचरा वेचकांच्या मुलांसाठी काम करत असलेल्या अनुबंध या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या मुलांना शैक्षणिक मार्गदर्शन, साहाय्य मिळते. दुर्बल घटकातील मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी अनुबंध संस्था कार्यरत आहे. घरची आर्थिक बेताची परिस्थिती, घरातून शैक्षणिक मार्गदर्शनाचा अभाव अशा परिस्थितीत आपल्या मुलांनी चांगले यश संपादन केल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.