बदलापूर : मुरबाड विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील मतदार यादीत तब्बल १९ हजार दुबार नावे असल्याचा खळबळजनक आरोप शिंदेंचे शिवसेनेचे बदलापूर शहर प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी केला आहे. भाजपच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकाचे नाव घेऊन त्यांचे नाव तीन ठिकाणच्या यादीत असल्याचा आरोपही म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. शहराबाहेरच्या मतदारांनी पालिका निवडणुकीत मतदान करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यांना केंद्रावरच चोप देऊ असा गंभीर इशाराही त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे राज्यात मतदार यादीवरून विरोधकांकडून सरकारला आणि निवडणूक आयोगाला घेरण्याच्या प्रयत्नात आता शिंदे सेनेचे पदाधिकारीही सामील झाल्याचे दिसते आहे.

राज्यात आणि देशात गेल्या काही महिन्यांपासून मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप केला जातो आहे. विरोधकांकडून आणि विशेषतः राज्यात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडीच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने सरकारला कोंडीत पकडली जाते आहे. मतचोरीच्या आरोपावरून काही दिवसांपूर्वीच राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही निवडणूक आयोगाची भेट घेत गंभीर आरोप केले आहेत. राज्यात नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांच्यासाठी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली. मात्र या यादीवर सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.

कुळगाव बदलापूर नगरपालिकेवर गेल्या काही वर्षात शिवसेनेचे वर्चस्व पाहायला मिळाले. मात्र प्रारूप मतदार यादी नंतर सर्वप्रथम शिंदे यांच्या शिवसेनेनेच मतदार यादीवर आक्षेप घेतले. रविवारी शिवसेनेचे शहर प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेत मतदार यादीतील घोळ उघडकीस आणला. कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीसाठी जी यादी वापरली जाते आहे ती विधानसभा निवडणुकीची मतदार संघ निहाय यादी आहे. या यादीत सुमारे १९ हजार दुबार मतदार असल्याचा आरोप वामन म्हात्रे यांनी केला आहे. बदलापूर शहराच्या आजूबाजूचा अंबरनाथ तालुक्यातील परिसर, चोन, कर्जत, बारवी धरण परिसर, मलंगगड, कल्याण, शहापूर भागातल्या व्यक्तींची नावे बदलापूर शहरातील यादीमध्ये समाविष्ट करण्यात आल्याची खळबळजनक माहिती मात्र यांनी यावेळी दिली. तर शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच संस्थांशी संबंधित व्यक्तींनी आपली नावे वेगवेगळ्या प्रभागांमध्ये नोंदवल्याचा दावाही शिवसेनेचे माजी गट नेते श्रीधर पाटील यांनी या पत्रकार परिषदेत केला.

भाजपच्या एका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकाचे नाव ठाणे बदलापूर आणि त्यांच्या मूळ गावी आहे. त्यांनी त्यापैकी एका ठिकाणी नाव ठेवावे इतर नावे बात करावीत असे आवाहन यावेळी वामन म्हात्रे यांनी केले. या पदाधिकाऱ्याच्या नावाचा दाखला देत म्हात्रे यांनी थेट भाजपला लक्ष केल्याचे बोलले जाते.

शहराबाहेरच्या आम्हाला माहीत असलेल्या मतदारांनी शहरात येऊन मतदान केल्यास आम्ही त्यांना मतदान केंद्रांवरच चोप देऊ असा गंभीर इशाराही म्हात्रे यांनी या पत्रकार परिषदेत दिला आहे. निवडणूक काळात आमचे शिवसैनिक शहराच्या वेशीवर पहारा देतील अशी ही माहिती म्हात्रे यांनी दिली आहे. निवडणूक आयोग जिल्हाधिकारी आणि पालिका प्रशासनाने आमच्या तक्रारीची तातडीने दखल घ्यावी असेही आवाहन म्हात्रे यांनी केले. शहरा बाहेरचे लोक आमच्या शहराचे लोकप्रतिनिधी ठरू शकत नाही. त्यांना तो अधिकार नाही. त्यामुळे या याद्यांची दुरुस्ती तातडीने करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दुबार आणि बोगस मतदार नोंदणी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ही यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.