Thane News, Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) : ठाणे : शिवसेना ( शिंदे गट ) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावरून केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत. अशाचप्रकारे ठाण्यातील दिवा भागातही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवसैनिकांनी ‘ बाम’ चे फलक झळकावत रामदास कदमांच्या फोटोला जोडे मारून अनोखे आंदोलन केले.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना ( शिंदे गट ) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचेही ठसे घेण्यात आले होते असे विधान रामदास कदम यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवसैनिकांकडून आंदोलन करत त्यात कदम यांचा निषेध करण्यात येत आहे. अशाचप्रकारे ठाण्यातील दिवा भागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला.

‘बाम’चे फलक झळकावले

यावेळी शिवसेना महिला आघाडी कार्यकर्त्या आणि शिवसैनिकांनी एकत्र येऊन “बामदास कदम” असा उपहासात्मक उल्लेख करत, ‘ बाम’चे फलक झळकावत अनोखे आंदोलन केले. या प्रकारामुळे दिव्यातील ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. या वेळी उपजिल्हा संघटिका अंकिता पाटील, विधानसभा संघटिका योगिता नाईक, शहर समन्वयक प्रियंका सावंत, उपशहर संघटिका स्मिता जाधव, विभाग प्रमुख योगेश निकम, हेमंत रसाळ, तसेच महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

रामदास कदम यांच्यावर टीका

बाळासाहेबांच्या नावावर राजकारण करून मोठे झालेले कदम आता त्यांच्या निधनाचं राजकारण करत आहेत. ज्या ताटात खाल्लं, त्या ताटालाच लाथ मारणारे हे गद्दार आहेत, असे शहर प्रमुख सचिन पाटील यांनी सांगितले. तर, रामदास कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारत महिला आघाडीच्या शहर संघटिका ज्योती पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला ओळख दिली, त्यांच्या बद्दल अशा शब्दांत बोलताना लाज वाटली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.