डोंबिवली – एक संपादक म्हणून संजय राऊत यांच्याकडे काही विचार आहेत असे वाटत होते. पण आता त्यांची बेताल वक्तव्य पाहून ते नक्की विचार प्रवर्तक या गटात राहिले आहेत की नाही असा प्रश्न पडतो. आणि त्यांची सर्व प्रकारची बेताल विकृत वक्तव्य पाहिली तर नक्की उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख संजय राऊत की उध्दव ठाकरे असा प्रश्न प्रत्येकाला पडू लागला आहे, अशी टीका शिंदे शिवसेनेचे डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी शुक्रवारी येथे केली.
धर्मवीर आनंद दिघे यांच्याबद्दल गुरूवारी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी बेताल वक्तव्य केल्याबद्दल संतप्त झालेल्या शिंदे शिवसेनेच्या शिवसैनिकांनी शुक्रवारी आमदार राजेश मोरे, शहरप्रमुख विवेक खामकर, ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी यांच्या उपस्थिती भर पावसात संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध आणि त्यांच्या प्रतिमेला चपला मारो आंदोलन इंदिरा चौकात केले. यावेळी आमदार राजेश मोरे, सदानंद थरवळ यांनी संजय राऊत यांच्या बेताल वक्तव्य आणि त्यांच्या दैनंदिन बोलण्यावर खरपूस टीका केली.
चोळूगिरी करून झालेला संपादक आणि त्यांना कसली आलीय विद्वत्ता. ती असती तर आज ते उठसूठ बेताल वक्तव्य करत सुटले नसते. कोणाची तरी सुपारी घ्यायची आणि सकाळपासून ते रात्रीपर्यंत वाजवत बसायचे ही संजय राऊत यांची शैली झाली आहे. निष्ठावान शिवसैनिकांच्या जीवावर संजय राऊत आपण मानाच्या पदापर्यंत पोहचलात हे तुम्ही अजिबात विसरू नये.
शिवसेनाप्रमुख, जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची नावे घेण्याची पण आपली पात्रता नाही. आणि राऊत खुल्या चर्चेची भाषा करत असतील तर आम्ही भांडुप येथे त्यांच्या घरासमोर जाऊन चर्चा करण्यास तयार आहोत. राऊत यांनी आमचे आव्हान स्वीकारावे, असे प्रति आव्हान थरवळ यांनी संजय राऊत यांना दिले.
‘संजय राऊत म्हणजे एक भोंगा आहे. त्यांची कार्यसिध्दता आता संपली आहे. मी म्हणजे उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष. अशी त्यांची मानसिकता आहे. राहुल गांधी, शरद पवार यांच्याकडून सुपाऱ्या घेऊन ते पक्ष संपवायला निघाले आहेत. संजय राऊत आमच्या आदरणीय जिल्हाप्रमुख आनंद दिघे, शिवसेनाप्रमुख यांच्या विषयी वाट्टेल तसे बरळत राहणार असतील तर मात्र शिवसैनिक त्यांना घरात घुसून मारल्या शिवाय राहणार नाहीत, असा इशारा आमदार राजेश मोरे यांनी दिला आहे.
यावेळी संजय राऊत यांच्या प्रतिमा जमिनीवर पावसात टाकून, त्यावर पावसाचा चिखल माती टाकून त्या प्रतिमा मलीन करण्यात आल्या. काही महिलांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेधाच्या घोषणा दिल्या.