बदलापूरः शिवसेनेचे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख आणि ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांनी अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार ) पक्षात प्रवेश केला आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार किसन कथोरे यांच्याविरूद्ध लढण्यासाठी पवार तयारी करत होते. या प्रवेशासह त्यांच्या उमेदवारीवरही शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे येथून शरद पवार गटातून इच्छुक असलेले बदलापुरचे शहर अध्यक्ष शैलेश वडनेरे काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड विधानसभा मतदारसंघात एकेकाळी कॉंग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. सुरूवातीला शांताराम घोलप आणि पुढे गोटीराम पवार यांच्या माध्यमातून हा मतदारसंघ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात राहिला. गोटीराम पवार यांच्या चार टर्म आमदारकीनंतर आता पुन्हा त्यांचे पुत्र सुभाष पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. काही वर्षांपूर्वी सुभाष पवार यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना शिवसेनेने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पदही दिले होते. त्यांच्याकडे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख पदही होते. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही ही जागा भाजपला गेल्याने इच्छुक असलेले सुभाष पवार यांची कोंडी झाली. पवार यांनी महाविकास आघाडीची दारे यापूर्वीच ठोठावली होती. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाकडे जाण्याची शक्यता असल्याने त्यांनी तसा संपर्क यापूर्वीच केल्याची माहिती होती. रविवारी भाजपने आपल्या पहिल्याच यादीत आमदार किसन कथोरे यांना येथून उमेदवारी जाहिर केल्यानंतर सुभाष पवार यांनी आपण निवडणूक तर लढणारच, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षात जाणार हे निश्चित मानले जात होते. त्यानुसार सोमवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि माजी आमदार गोटिराम पवार यांच्या उपस्थितीत सुभाष पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशासोबतच पवार यांना पक्षातर्फे उमेदवारीही मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता किसन कथोरे विरूद्ध सुभाष पवार असा पारंपारिक सामना होणार आहे.

हे ही वाचा… ठाण्यात हिट अँड रन, भरधाव मर्सिडीज कारची तरूणाला धडक, अपघातात तरुणाचा मृत्यू

हे ही वाचा… क‌ळवा-मुंब्र्यात अजित पवार गटाला धक्का, अनेक पदाधिकाऱ्यांची शरद पवार गटात वापसी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पवारांच्या प्रवेशाला आक्षेप

ज्यांनी आज पक्षात प्रवेश केला ते ठेकेदार आहेत. वडिलांच्या पुण्याईवर यांचे राजकारण आहे. अशाप्रकारे पक्षानेही लोकांना प्रवेश आणि उमेदवारी देणे योग्य नाही. आम्ही पक्षासाठी काम करत आहोत. पक्षाने बाहेरून आलेल्या उमेदवाराला आणि ज्याने लोकसभेला पक्षविरोधी काम केले त्याला उमेदवारी दिल्यास आमचा विरोध राहिल. आम्ही निवडणूक लढवणार कशा पद्धतीने ते लवकरच जाहीर करू. – शैलेश वडनेरे, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शऱद पवार) पक्ष, बदलापूर.