डोंबिवली – मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील अनेक रेल्वे स्थानके दररोज सकाळ ते रात्रीपर्यंत फेरीवाले, वाहतूक कोंडी, बस अशा विविध प्रकारच्या कोंडीने गजबजलेली असतात. प्रवाशांना या कोंडीतून वाट काढत रेल्वे स्थानकात प्रवास करावा लागतो. प्रवाशांना होणाऱ्या या दररोजच्या गजबजाटाचा देखावा डोंबिवली जवळील ठाकुर्लीतील सजावटकार रूपेश राऊत या तरूणाने आपल्या घरगुती गणपती उत्सवात साकारला आहे.
आजुबाजुला घडणाऱ्या घडामोडी, वास्तवदर्शी देखावे उभे करण्यावर सजावटकार रूपेश राऊत आणि सहकाऱ्यांचा दरवर्षी भर असतो. यापूर्वी राऊत आणि सहकाऱ्यांनी टोकीयो ऑलिम्पिकमधील ॲथलेटिक्सचे मैदान, कर्करोग जनजागृतीचा विचार करून टाटा रूग्णालयाची प्रतिकृती, प्रवाशांचे लोकल प्रवासात होणारे हाल विचारात घेऊन कल्याण डोंबिवली शहर परिसरात माहिती आणि तंत्रज्ञान हब उभारण्याची मागणी करावे देखावे उभे केले होते.
यावर्षी दिवसेंंदिवस मध्य, पश्चिम रेल्वेच्या अनेक स्थानकांच्या बाहेर फेरीवाले, वाहने, बस, पादचारी यांचा पडलेला विळखा. यामुळे नोकरदारांना होणारा त्रास याचा विचार करून रेल्वे स्थानकांबाहेरचे विदारक चित्र सजावटकार रूपेश राऊत आणि सहकाऱ्यांनी ठाकुर्लीतील आपल्या गणपती मखरात उभारले आहे.
रेल्वे स्थानकांबाहेर शासन, स्थानिक पालिका प्रशासनांनी रिक्षा वाहनतळ, बस थांबे, फेरीवाल्यांचे स्वतंत्र विभाग, पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गिका, रेल्वे स्थानकातून बाहेर पडण्यासाठी आणि आत जाण्यासाठी रिक्षा वाहनतळ ते रेल्वे स्थानक, बस स्थानक अशा स्वतंत्र मार्गिका आणि आवश्यक रचना केल्या तर रेल्वे स्थानकांबाहेरील गजबजाटी वातावरण कमी होण्यास साहाय्यक होईल, असे सजावटकार रूपेश राऊत यांचे म्हणणे आहे.
वर्षानुवर्ष प्रवासी रेल्वे स्थानकांबाहेरील गजबजाटी वातावरणातून प्रवासी प्रवास करतात. याची पुरेपुर जाणीव स्थानिक पालिका प्रशासन, रेल्वे प्रशासन यांना असुनही कोट्यवधी रूपयांचा महसूल शासनाला मिळवून देणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानिक पालिका काहीही करत नाही आणि शासनही यासाठी उपाय योजना करण्याचे निर्देश देत नाही याविषयी प्रवाशांमध्ये चीड आहे.
प्रत्येक प्रवासी नोकरदार हा आपल्या कामाच्या गडबडीत असतो. त्यामुळे रोजचे रेल्वे स्थानकाबाहेर धक्केबुक्के खात प्रवास करण्याचे दिवस तो काढत असतो. याविषयी बोलायचे कोणाला आणि सांगायचे कोणाला. आपण तक्रार केली तर त्याची दखल घेतली जाईल का अशा अनेक विचारांनी प्रवासी आहे त्या परिस्थितीला तोंड देत आपला दैनंदिन प्रवास करत असतो. रेल्वे प्रशासन, स्थानिक पालिका प्रशासन यांनी समन्वयाने मध्य, पश्चिम रेल्वे स्थानकांबाहेर जो गजबजाट तयार झाला आहे तो कमी करावा अशीच तमाम प्रवाशांची मागणी आहे. प्रवाशांच्या मनातील दैनंदिन खदखद आपल्या गणेशोत्सवाच्या देखाव्यातून साकारली आहे, असे सजावटकार राऊत सांगतात.