ठाणे – वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे उद्योजक वर्ग हैराण झाले असून ‘आम्ही गुजरातला स्थलांतरित व्हायचे का?’ असा प्रश्न काही उद्योजकांनी ठाण्यात बोलताना उपस्थित केला. ठाणे शहरात टीसाच्या माध्यमातून महावितरण अधिकारी आणि उद्योजकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाणे, पनवेल, कल्याण, शहापुर येथील उद्योजकांनी महावितरण अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्या मांडल्या. यावेळी महावितरण अधिकाऱ्यांनी उद्योजकांच्या समस्या ऐकूण त्यावर येत्या दोन महिन्यात तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले.
ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसर हा औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखला जातो. याठिकाणी लघु आणि मध्यम उद्योगांसह मोठ्याप्रमाणात आयटी पार्क देखील आहेत. गेले काही वर्षांपासून याभागात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे उद्योजक समुहामध्ये प्रचंड नाराजी पसरली असून त्यांच्या मधून महावितरणाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
ठाणे शहरातील औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांच्या समस्या तसेच वागळे इस्टेट, एमआयडीसी भागात वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन (TSSIA) येथे महावितरण अधिकारी आणि उद्योजक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भांडूप अर्बन झोनचे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी उद्योजकांशी संवाद साधला. या औद्योगिक क्षेत्रात वीज पुरवठेच्या तुलनेने वीजेची मागणी आणि भार वाढला आहे. त्यामुळे या भागात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. याचा फटका उद्योजकांना बसत असून ते हैराण झाले असल्याची खंत यावेळी अध्यक्ष संदीप पारीख यांनी व्यक्त केली.
ठाणे शहरासह, कल्याण, शहापूर, पनवेल, खालापूर, कळंबोली अशा विविध भागातील ५० ते ६० उद्योजक या बैठकीला उपस्थित होते. यावेळी काही उद्योजकांनी वारंवार होत असलेल्या वीज खंडीतमुळे त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचून दाखवला. यात, १ एप्रिल ते २९ जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत ११६ तास वीज पुरवठा खंडीत झाला होता. या कालावधीत सर्वच उद्योजकांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहेत.
या आहेत समस्या…
वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर महावितरण विभागाला संपर्क साधला तर, त्यांच्याकडून अनेकदा कर्मचारी उपलब्ध नाही किंवा काम करण्यासाठी हातमौजे नाही अशा प्रकारची उत्तरे दिली जातात. औद्योगिक कंपन्यांची संख्या लक्षात घेता, वीज पुरवठ्यावर भार वाढत आहेत. यामुळे अनेकदा वीज वाहिन्या जळण्याचे प्रकार घडतात. तसेच महावितरण विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. तर, महावितरणाकडून केले जात असलेल्या शटडाऊनचे संदेश वेळेत उद्योजकांना मिळत नाही, अशा विविध समस्या उद्योजकांनी या बैठकीत मांडल्या.