scorecardresearch

ठाणे : करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर ‘वर्धक मात्रेला प्रतिसाद वाढला

दिवसाला बाराशे ते पंधराशे नागरिक वर्धक मात्रा घेत आहेत

covid-vaccine vaccination
(प्रातिनिधिक छायाचित्र)

मागील महिन्याभरापासून करोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे ओसाड पडले लसीकरण केंद्रांवर नागरिक लस घेण्यासाठी गर्दी करत आहेत. यामध्ये वर्धक मात्रा घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात मे महिन्यात दिवसाला ८०० ते ९०० नागरिक वर्धक मात्रा घेत होते. परंतू, यामध्ये आता वाढ झाली असून दिवसाला बाराशे ते पंधराशे नागरिक वर्धक मात्रा घेत आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

आरोग्य सेवक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि ६० वर्षावरील नागरिकांना जानेवारी महिन्यापासून शासकीय लसीकरण केंद्रांवर वर्धक मात्रा देण्यास सुरुवात झाली. तर, यापाठोपाठ १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रांवर सशुल्क वर्धक मात्रा उपलब्ध करण्यात आली. ज्या नागरिकांना दुसरी मात्रा घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत अशा नागरिकांना वर्धक मात्रा दिली जात आहे. ज्या वेळेस वर्धक मात्रा घेण्यास शासनामार्फत परवानगी देण्यात आली तेव्हा करोना प्रादूर्भाव कमी होता. त्यामुळे वर्धक मात्रेला नागरिकांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले होते. नागरिकांना दुसरी मात्रा घेऊन नऊ पूर्ण होत असतानाही नागरिक वर्धक मात्रा घेण्यास पुढाकार घेत नव्हते. तसेच १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना सशुल्क वर्धक मात्रा उपलब्ध असल्यामुळे हे नागरिक लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र होते. मात्र, जुन महिन्यात पुन्हा करोना रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून वारंवार नागरिकांना लसीकरणाबाबत आवाहन करण्यात येत आहे. त्यानुसार, जिल्ह्यात ओसाड पडलेल्या लसीकरण केंद्रांवर नागरिकांची लस घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. यामध्ये दुसरी तसेच वर्धक मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण हे मोठ्याप्रमाणात आहे.

मे महिन्यात १८ वर्षावरील २८ हजार ४२९ नागरिकांनी जिल्ह्यातील विविध खासगी तसेच शासकीय केंद्रांवर जाऊन वर्धक मात्रा घेतली होती. परंतू, जुन महिन्यात करोना प्रादूर्भाव वाढताच यासंख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. १ जून ते आतापर्यंत ४१ हजार ८६६ नागरिकांनी वर्धक मात्रा घेतल्याचे लसीकरण अहवालातून स्पष्ट झाले आहे. यामध्ये ४५ वर्षावरील सर्वाधिक म्हणजेच २८ हजार ९८० नागरिकांचा समावेश असल्याचे पाहायला मिळत आहे.

वर्धक मात्रा घेण्यासाठी नागरिकांचा सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. परंतू, करोना प्रादूर्भाव वाढताच वर्धक मात्रा घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. अशी माहिती ठाणे जिल्ह्याच्या लसीकरण अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांनी दिली.

जिल्ह्यात मागील दोन महिन्यात वर्धक मात्रा घेतलेल्या नागरिकांची संख्या –

वयोगट – मे – जून
आरोग्य सेवक -२५८१-४१९९
अत्यावश्यक कर्मचारी -३३११-६४७२
१८ ते ४४ – ८२४ -२२१५
४५ वर्षावरील – २१७१३ -२८९८०
एकूण – २८४२९ – ४१८६६

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thane due to the increasing prevalence of corona the response to booster does has increased msr