ठाणे : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र आल्यानंतर ठाण्यात आता बॅनरबाजीला सुरुवात झाली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील मुख्य चौकात चक्क ‘धन्यवाद देवाभाऊ…. तुमच्यामुळे एकत्र आले ठाकरे भाऊ’ अशा आशयाचे फलक झळकविले आहेत. मुख्य चौकातील हे बॅनर ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.
वरळी येथे शनिवारी सकाळी मराठी विजयी मेळावा कार्यक्रम झाला. मेळाव्यास कधी नव्हे ते दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. हा मेळावा पाहण्यासाठी राज्यभरातून मनसैनिक आणि शिवसैनिक (ठाकरे गट) वरळी येथे जमले होते. मेळावा झाल्यानंतर दोन्ही पक्षाकडून आता ठाकरे बंधू एकत्र आल्याचे बॅनर बसविले जात आहेत. ठाण्यात मनसेचे शाखाध्यक्ष संतोष निकम आणि उपशाखा अध्यक्ष अक्षय आंबेरकर यांनी बॅनर झळकविले आहेत.
यामध्ये धन्यवाद देवाभाऊ…. तुमच्यामुळे एकत्र आले ठाकरे भाऊ असा आशय यात लिहीला आहे. तसेच वाद संपले, विश्वास वाढला महाराष्ट्राची नवी उभारी असेही यात म्हटले आहे. या बॅनरच्या मधोमध दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज आणि उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र आहे. हे बॅनर आता ठाणेकरांचे लक्ष वेधत आहेत.