Mumbai Maratha Reservation Protest Manoj Jarange : ठाणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे हे उपोषणाला बसले असून त्यांना पाठींबा देण्यासाठी राज्याच्या विविध भागातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत.
वाहनांचा भार वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असतानाही उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही मराठा आंदोलक ठाणे मार्गे मुंबईत जात होते. या वाहनांना पोलिस आनंदनगर नाका येथे पार्किंगसाठी जागा देऊन त्यांना रेल्वे मार्गे पाठवित होते. यामुळे ठाण्यातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील मुंबई मार्गिकेवर वाहतूक कोंडी झाली होती.
मुंबईतील आझाद मैदान येथे मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी ते उपोषण करीत आहेत. जरांगे यांना पाठींबा देण्यासाठी ठाणे जिल्ह्यासह नाशिक आणि इतर जिल्ह्यातील नागरिक स्वत:च्या वाहनाने मुंबईत दाखल झाले आहेत. यातील अनेक मराठा आंदोलकांची वाहने ठाणे मार्गे मुंबईत गेली. या आंदोलकांना जेवण आणि अल्पोहाराची व्यवस्था ठाण्यातील मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. काहीजण सायंकाळी पुन्हा ठाणे मार्गे घरी परतले. परंतु जरांगे यांना दुसऱ्या दिवशी म्हणजेच, शनिवारीही उपोषण करण्यास पोलिसांनी परवानगी दिली. यामुळे अनेकजण शनिवारी पुन्हा मुंबईत दाखल होण्यास सुरुवात केली. ठाणे मार्गे मराठा आंदोलकांची वाहने मुंबईत जात असल्याने ठाण्यात वाहतूक कोंडी झाली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांना पाठींबा देण्यासाठी राज्याच्या विविध भागातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. अनेकजण स्वत:ची वाहने घेऊन आले आहेत. शहरात वाहनांचा भार वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. असे असतानाही उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही मराठा आंदोलक वाहनाने ठाणे मार्गे मुंबईत जात होते.
मुंबईत वाहने पार्किंगसाठी जागा शिल्लक राहिलेली नसून रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिस आनंदनगर नाका येथे आंदोलकांची वाहने रोखून त्यांना परिसरात वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देत होते आणि रेल्वे मार्गे मुंबईत पाठवित होते. यामुळे ठाण्यातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील मुंबई मार्गिकेवर वाहतूक कोंडी झाली होती. या कोंडीचा फटका शहरातील अंतर्गत मार्गांनाही बसला. या कोंडीमुळे वाहनचालक हैराण झाले होते.