ठाणे : ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांची बदली करण्यात आली आहे. निवडणुक विभागात कार्यरत असलेले सचिन बोरसे यांच्याकडे आता परवाना, जनगणना आणि नागरी सुविधा केंद्राची जबाबदारी देण्यात आली आहे. तर तर बाळु पिचड यांच्याकडे निवडणुक विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

प्रशासकीय कामकाजाच्या सोईसाठी ही बदली झाल्याचे आदेशात म्हटले असले तरी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी आणि मनसेने मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर सचिन बोरसे यांच्यावर मोर्चातील शिष्टमंडळाने आरोप केले होते. त्यामुळे ही बदली झाल्याची चर्चा राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये रंगू लागली आहे.

ठाणे शहरात काही दिवसांपूर्वीच शिवसेना (ठाकरे गट), मनसेने ठाणे शहरातील नागरी समस्यांविषयी मोर्चा काढला होता. या मोर्चाला राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेसने पाठिंबा दिला होता. या मोर्चाच्या निमित्ताने मनसे आणि महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. महापालिकेतील काही विभागात भ्रष्ट अधिकारी काम करत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. निवडणुक विभागात कार्यरत असलेले साहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांची बदली का केली जात नाही असा प्रश्नही उपस्थित केला. गुरुवारी सांयकाळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी बोरसे यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. बोरसे यांच्याकडे निवडणुक आणि परवाना विभाग होता. त्यातील निवडणुक विभाग त्यांच्याकडून काढण्यात आला असून त्याचा पदभार कार्यालयीन अधिक्षक बाळू पिचड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसेच उथळसर प्रभाग समितीचा देखील पदभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे. तर बोरसे यांच्याकडे परवाना विभाग कायम ठेवण्यात आला असून जनगणना आणि नागरी सुविधा केंद्राचा पदभार देण्यात आला आहे.