ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील चौक, रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी बेकायदा बॅनर्स, होर्डिंग्ज आणि पोस्टर लावण्याचे प्रकार वाढीस लागले असून यामुळे शहराचे होणारे विद्रुपीकरण रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने आता बेकायदा बॅनरविरोधात विशेष मोहिम हाती घेतली आहे. यामध्ये एकाच दिवशी ६६५ बेकायदा बॅनर्स, होर्डिंग्ज आणि पोस्टर हटविण्यात आले आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात वाढदिवस तसेच विविध कार्यक्रमानिमित्ताने बॅनर्स लावण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याच्या दुभाजकांवर, पादचारी मार्गांवर तसेच झाडांवर बॅनर्स लावण्यात येत आहेत. यामध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांना शुभेच्छा देणाऱ्या फलकांचे प्रमाण सर्वाधिक दिसून येते. पालिकेने काही महिन्यांपुर्वी बॅनरविरोधात विशेष मोहिम हाती घेतली होती. या मोहिमेनंतर शहर बॅनरमुक्त झाले होते. मात्र, ही कारवाई थंडवताच शहरात पुन्हा बेकायदा बॅनर लावण्याचे प्रकार वाढले आहेत. वीजेचे खांब, रस्त्याच्या दुभाजकांवर, पादचारी मार्गांवर तसेच झाडांवर लावलेले बॅनर्स पडून अपघात होण्याची शक्यता असते. अनेकदा वाढदिवस किंवा कार्यक्रम होऊन गेल्यानंतरही बॅनर काढले जात नाहीत. या बॅनर्समुळे शहराचे विद्रुपीकरण होते. या प्रकरणी पालिका प्रशासनाकडे तक्रारी येऊ लागल्या होत्या. दरम्यान, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरात बेकायदा बॅनरविरोधात विशेष मोहिम हाती घेतली आहे. यामध्ये रस्त्याच्या दुभाजकांवर, पादचारी मार्गांवर तसेच झाडांवर धोकादायकरित्या लावलेले सर्व पोस्टर्स, बॅनर्स पूर्णतः हटविण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे, सर्व प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त तसेच प्रभागसमितीतील अतिक्रमण विभागाचे कर्मचाऱ्यांनी केली. ठाणे महापालिका क्षेत्रात एका दिवसांत ६६५ अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स हटविण्यात आले. ही मोहिम यापुढेही सातत्याने सुरू राहील असे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे.
प्रभागसमितीनिहाय बॅनर्स, पोस्टर्सवर करण्यात आलेली कारवाई
नौपाडा प्रभाग समिती – ७६
कोपरी प्रभाग समिती – ५४
वागळे इस्टेट प्रभाग समिती – ५५
लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती – ६६
वर्तकनगर प्रभाग समिती – ६५
माजिवडा मानपाडा प्रभाग समिती – ६७
उथळसर प्रभाग समिती – ५३
कळवा प्रभाग समिती – ७२
मुंब्रा प्रभाग समिती – ७५
दिवा प्रभाग समिती – ८२