ठाणे : बेकायदा बांधकामामुळे सातत्याने चर्चेत असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा परिसरात गेल्या काही वर्षात फेरिवाले वाढले असून या फेरिवाल्यांवर कारवाईवर होत असल्याबद्दल ठाकरे गटाने काही दिवसांपुर्वी नाराजी व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ आता दिव्यात फेरीवाल्यांकडून दररोज ५० रुपये हप्ता वसूली जात असल्याचा गंभीर आरोप करत याप्रकरणी वसुली करणाऱ्यांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी पोलिसांकडे केल्याने खळबळ उडाली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा परिसराचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. या परिसरातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा सातत्याने चर्चेत येत असतानाच, आता रस्ते आणि पदपथ अडविणाऱ्या फेरिवाल्यांचा मुद्दाही ऐरणीवर येत आहे. दिवा भागातील नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही ठाणे महापालिका रस्त्यांवरील अनधिकृत हातगाड्यांविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई करत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या हातगाड्यांमुळे सार्वजनिक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत असून, शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
सार्वजनिक रस्ते मोकळे ठेवणे आणि अतिक्रमण हटवणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. परंतु, महानगरपालिका या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत आहे, असे रोहिदास मुंडे यांनी म्हटले होते. या संदर्भात कारवाई झाली नाहीतर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यापाठोपाठ आता मुंडे यांनी फेरिवाल्यांकडून हप्ता वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
दिवा परिसरात फेरीवाल्यांकडून दररोज ५० रुपये हप्ता वसूल केली जात असून वसुली करणाऱ्या दलालांविरुद्ध आवाज उठविला म्हणून सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी दबाव आणण्यासाठी दिवा चौकी येथे ऑकरन्स रिपोर्ट दाखल केला, असा आरोप मुंडे यांनी केला आहे. या प्रकाराविरोधात शनिवारी कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे आणि कल्याण जिल्हा संघटक तात्यासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळाने मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांची भेट घेऊन, फेरीवाल्यांकडून रोज हप्ता वसूल करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी लेखी मागणी केली, अशी माहिती मुंडे यांनी केली.
ही घटना म्हणजे जनतेसाठी लढणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून, संबंधित अधिकारी आणि गुन्हेगार यांच्यावर योग्य ती कारवाई केली नाही, तर तीव्र जनआंदोलन करण्यात येईल असे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी म्हटले आहे. तर, दिवा परिसरातील रस्ते, पदपथ हे नागरिकांच्या वापरासाठी आहेत, हप्ता वसुली करत अनधिकृतरित्या व्यवसायास प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी पाठीशी घालू नये. मी फक्त जनतेच्या हक्कासाठी लढा देत आहे, असे मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.