ठाणे : नया है वह, सहा ते सात वर्षांपूर्वी हिंदू झाला, त्याआधी तो विविध ठिकाणी रोजा तोडायला जायचा, टोपीवाल्यांवर फिरायचा, असे म्हणत मनसे नेते अविनाश जाधव यांनी मंत्री नीतेश राणे यांची खिल्ली उडवली.
जिथे सत्ता, तिथे ही पळणारी लोक आहेत, त्यांना जास्त मनावर घेऊ नका, असा टोलाही त्यांनी लगावला. मीरा रोडवरील बालाजी हॉटेलजवळील जोधपूर स्वीट्सच्या मालकाने मराठी बोलण्यास नकार दिल्याने त्याला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यानंतर मीरातोडमध्ये व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. या प्रकरणावरून वातावरण तापले असतानाच, दुकानदाराला मारहाण केल्याप्रकरणी नीतेश राणे यांनी प्रतिक्रिया देत करत मनसेला आव्हान दिले होते.
“एका हिंदूची हत्या करण्यात आली आहे. गरीब हिंदूंवर हात उचलणाऱ्यांनी नळबाजार आणि मोहम्मद अली रोडवर जाऊन जिहादींना मारहाण करण्याचे धाडस दाखवावे. कारण त्यांच्या तोंडून मराठी कधीच ऐकू येत नाही, असे नीतेश यांनी आव्हान दिले होते. त्यावर आता मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया देत मंत्री नीतेश राणे यांची खिल्ली उडवली.
नया है वह, सहा सात वर्षांपूर्वी हिंदू झाला, त्याआधी तो विविध ठिकाणी रोजा तोडायला जायचा, टोपीवाल्यांवर फिरायचा, त्यावेळी हे लोक त्यांना मतदान करत होते, तेव्हा त्यांना आवडीने घेत होते.परंतु आता त्यांचा उपयोग नाही म्हणून त्यांच्या बद्दल बोलत आहेत, असे अविनाश जाधव म्हणाले.
नितेश राणे यांनी दहा वर्षांपूर्वीचे व्हिडिओ काढावेत आणि पहावे, असा सल्लाही त्यांनी दिला. आज ते हिंदू आहेत, कारण भाजपची सत्ता आहे, उद्या सत्ता गेली की, ते पुन्हा बदलतील. जिथे सत्ता असेल तिथे पळणारी ही लोक आहेत, जास्त मनावर घेऊ नका, अशी टीका जाधव यांनी केली.